Home नंदुरबार जिल्हा महावितरण प्रदर्शनी क्रिकेट सामन्यात मुख्यालय संघाचा रोमहर्षक विजय; नागपूर संघाचा पराभव

महावितरण प्रदर्शनी क्रिकेट सामन्यात मुख्यालय संघाचा रोमहर्षक विजय; नागपूर संघाचा पराभव

3
Thrilling victory of the headquarters team in the Mahavitaran exhibition cricket match; Nagpur team defeated

नंदुरबार: श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या क्रीडासंकुलात सुरु असलेल्या महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रदर्शनी क्रिकेट सामन्यात बुधवारी (दि. १२) मुंबई मुख्यालय संघाने १२ षटकांमध्ये ९६ धावांचे आव्हान देत नागपूर प्रादेशिक संघाला ९० धावांवर रोखले व शेवटच्या षटकापर्यंत रंगतदार झालेल्या या सामन्यात सहा धावांनी विजय मिळवला.

महावितरणचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सामना सुरू झाला. मुंबई मुख्यालयाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली व खराब चेंडूवर फटकेबाजी सुरू केली आणि १२ षटकांमध्ये ६ बाद ९६ धावा केल्या. यात कार्यकारी संचालक श्री. प्रसाद रेशमे (१३ धावा), सहायक महाव्यवस्थापक श्री. वैभव थोरात (१८ धावा) व उपमहाव्यवस्थापक प्रमोद खुळे (१७ धावा) यांनी धावसंख्येला आकार दिला. तर कार्यकारी संचालक श्री. भुजंग खंदारे, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. संजय ढोके यांनीही साथ दिली. मात्र नागपूर प्रादेशिक संघाने १८ धावा अतिरिक्त दिल्याने मुख्यालय संघाची सामन्यावरील पकड मजबूत झाली.

नागपूर प्रादेशिक संघाने आव्हान स्विकारून सावध पवित्रा घेत फलंदाजी सुरू केली. यात अधीक्षक अभियंता संजय वाकडे (१८ धावा) तर कार्यकारी अभियंता श्री. प्रफुल लांडे (१५ धावा) यांनी चांगली भागिदारी करीत लक्ष्याकडे वाटचाल सुरू केली. त्यानंतर कार्यकारी अभियंता श्री. पुरूषोत्तम चव्हाण व उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. मधुसूदन मराठे यांनी प्रत्येकी ११ धावा केल्या. अमरावती परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. अशोक साळुंके यांनी ७ धावांचे योगदान देत संघाला विजयाकडे नेले. त्यांना चंद्रपूरचे मुख्य अभियंता श्री. हरिष गजबे व अधीक्षक अभियंता श्री. प्रविण दरोली यांनी साथ दिली. मात्र शेवटच्या षटकामध्ये विजयासाठी ११ धावांची गरज होती. मुख्यालय संघाकडून प्रमोद खुळे यांनी अचूक गोलंदाजी केली व इतरांनी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केले. त्यामुळे नागपूर प्रादेशिक संघ शेवटच्या षटकात केवळ पाच धावा करू शकला आणि मुख्यालय संघाने सहा धावांनी विजय मिळवला.

मुख्यालय संघामध्ये महाव्यवस्थापक राजेंद्र पांडे, कार्यकारी अभियंता श्री. सुनील पावरा व माणिक गवळी, वरिष्ठ व्यवस्थापक श्री. बजरंग सुर्यवंशी, उपविधी अधिकारी श्री. सुमेध कोलते तर नागपूर प्रादेशिक संघात मुख्य अभियंता श्री सुहास रंगारी (गोंदिया), श्री. दिलीप दोडके (नागपूर) व श्री. राजेश नाईक (अकोला) यांच्यासह सहायक महाव्यवस्थापक श्री. रूपेश देशमुख आदींचा समावेश होता.

फोटोचे नाव – MSEDCL Cricket Show Match 12-11-2025

फोटो ओळ – अमरावती : महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेनिमित्त आयोजित क्रिकेटच्या प्रदर्शनी सामन्यात मुंबई मुख्यालय संघाने नागपूर प्रादेशिक संघावर सहा धावांनी विजय मिळवला.