Home महाराष्ट्र सारंगखेडा दत्त जयंती यात्रा : चेतक फेस्टिवलमध्ये HIV–AIDS जनजागृती उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

सारंगखेडा दत्त जयंती यात्रा : चेतक फेस्टिवलमध्ये HIV–AIDS जनजागृती उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

2
Sarangkheda Datta Jayanti Yatra: Spontaneous response to HIV–AIDS awareness campaign at Chetak Festival

सारंगखेडा दत्त जयंती यात्रा आणि चेतक फेस्टिवलच्या निमित्ताने जिल्हा आरोग्य विभाग, जिल्हा रुग्णालय नंदुरबार तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, सारंगखेडा (तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, शहादा) यांच्या संयुक्त विद्यमाने HIV–AIDS तसेच विविध आजारांविषयी जनजागृती करण्यासाठी विशेष माहिती स्टॉल उभारण्यात आला आहे. या उपक्रमाला यात्रेकरू आणि नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

मा. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या या जनजागृती उपक्रमाचा उद्देश HIV–AIDS बाबत समाजात असलेले गैरसमज दूर करणे, आजाराविषयी योग्य माहिती देणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांची जाणीव करून देणे हा आहे.

या माहिती स्टॉलवर आयसीटीसी कर्मचारी श्री. तेजल माळी, श्री. साजिद अन्सारी, श्री. गणेश कासार, श्री. जितेंद्र सूर्यवंशी, श्री. किरण देवरे आणि श्री. अमोल सोनवणे यांनी उपस्थित नागरिकांना HIV–AIDS संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. सुरक्षित वर्तन, संसर्गाचे मार्ग, प्रतिबंधात्मक उपाय, उपलब्ध तपासण्या आणि उपचार पद्धती याविषयी सोप्या भाषेत माहिती देण्यात आली.

यासोबतच नागरिकांना माहितीपत्रकांचे वितरण करून आजाराविषयी असलेली भीती व गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अनेक नागरिकांनी स्टॉलवर भेट देऊन प्रश्न विचारले आणि उपलब्ध सेवांबाबत माहिती घेतली.

दत्त जयंती यात्रा व चेतक फेस्टिवलसारख्या मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमाच्या माध्यमातून राबविण्यात आलेला हा उपक्रम जनजागृतीसाठी प्रभावी ठरत असून, आरोग्याबाबत सजग समाज घडविण्याच्या दिशेने नंदुरबार जिल्हा आरोग्य यंत्रणेचा हा एक महत्त्वपूर्ण प्रयत्न मानला जात आहे.

[ HIV, AIDS, Collector Office Nandurbar]

#HealthForAll#HIV#AIDS