Home मनोरंजन रवींद्र महाजनी यांच्या निधनाने एक रुबाबदार अभिनेता गमावला

रवींद्र महाजनी यांच्या निधनाने एक रुबाबदार अभिनेता गमावला

22
Actor Ravindra Mahajani Passed away

(मुंबई) ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केले आहे. तसेच त्यांना मुख्यमंत्र्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

‘रवींद्र महाजनी यांनी आपला दमदार अभिनय, देखणेपण, रुबाबदार व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर मराठी चित्रपटसृष्टी गाजवली. नाटकांमधून सुरुवात करून महाजनी यांनी चित्रपटात केलेली आपली कारकीर्द मराठी रसिकांच्या निश्चितच लक्षात राहण्यासारखी आहे. त्यांच्या निधनाने एक गुणी अभिनेता आपल्यातून निघून गेला. ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांना भावपूर्ण श्रद्धांजली’, असेही मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनाने मराठी चित्रपट सृष्टीतील एक रुबाबदार अभिनेता हरपला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस शोकसंदेशात म्हणतात, महाजनी यांचे झुंज, मुंबईचा फौजदार, लक्ष्मीची पाऊले यांसारख्या चित्रपटात केलेले काम कायम स्मरणात राहील. त्यांना आणि त्यांच्या अभिनयाला देखणा हे विशेषण शोभून दिसयाचे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची ताकद त्यांना मिळो, हीच प्रार्थना.

मराठी चित्रपट सृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनाने दमदार अभिनय असणारे रुबाबदार व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांना श्रद्धांजली अर्पण केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात,  देखणे व्यक्तिमत्त्व, अष्टपैलू अभिनयाच्या बळावर ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांनी मराठी नाट्य-चित्रपट रसिकांच्या  हृदयसिंहासनावर अनेक दशके अधिराज्य करणारा महान कलावंत काळाच्या पडद्याआड गेला आहे. रवींद्र महाजनी यांच्या अभिनयाने मराठी कलारसिकांच्या पिढ्यांना मनमुराद आनंद दिला. मराठी कलासृष्टी समृद्ध करण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या निधनाने एक देखणा कलावंत काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांचे निधन ही मराठी कलासृष्टीची मोठी हानी आहे. अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोकभावना व्यक्त करीत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.