Home नंदुरबार जिल्हा शासकीय आदिवासी वसतीगृहात प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावे

शासकीय आदिवासी वसतीगृहात प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावे

12

(नंदुरबार) प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,नंदुरबार अंतर्गत सुरु असलेल्या 29 वसतीगृहांमध्ये सन 2023-2024 या शैक्षणिक वर्षांसाठी इयत्ता आठवी ते दहावीच्या पुढे शिक्षण घेणाऱ्या नविन व जुन्या विद्यार्थ्यांनी, तसेच अकरावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर, पदविका,व्यवसायीक अभ्यासक्रमांसाठी शासकीय आदिवासी वसतीगृहात प्रवेशासाठी विहीत मुदतीत ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

सन 2023-2024 या वर्षांत आदिवासी मुला/ मुलींचे शासकीय वसतीगृह प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे. इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक 15 जुलै, 2023, इयत्ता अकरावी व बारावी व पदवीसाठी 20 जुलै, 2023, पदव्यूत्तरसाठी 30 जुलै, 2023, पदविका व व्यवसायीक अभ्यासक्रमांसाठी 15 ऑगस्ट, 2023 पर्यंत विद्यार्थी अर्ज सादर करु शकतात.

वसतीगृह प्रवेशासाठी आवश्यक सूचना

शासकीय वसतीगृहात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी https://swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करणे आवश्यक आहे.

नविन व जुने विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरण्यापुर्वी संकेतस्थळावर दिलेल्या युजर मॅन्युअलचे वाचन करुन अर्ज अचूक भरावा. विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर अर्ज भरण्याकरिता प्रथम नोंदणी करावी, नोंदणी नंतर प्राप्त युजर आयडी व पासवर्ड चा उपयोग करुन अर्ज भरावा.जे विद्यार्थी सन 2023-2024 या शैक्षणिक वर्षांत (जुने विद्यार्थी ) प्रवेशित आहेत. अशा विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षांत देखील अर्ज भरणे आवश्यक आहे. याकरिता वसतीगृह ॲडमिशन यामध्ये रिनेव्हल वसतीगृह ॲडमिशन हा पर्याय काळजीपूर्वक निवडून अर्ज भरावा. वसतीगृह प्रवेश अर्ज भरण्यासाठी प्रथम महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणे आवश्यक राहील. वसतीगृहांसाठी अर्ज करतांना ऑनलाईन प्रणालीमध्ये अपलोड करण्यासाठी गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, आधार कार्ड झेरॉक्स, उत्पन्नाचा दाखला, शाळा, महाविद्यालयाचे बोनाफाईड, बँकेचे पासबूक, पालक शासकीय सेवेत नसल्याचा दाखला, रहिवासी दाखला, दिव्यांग, अथान असल्याचे प्रमाणपत्र इत्यादी आवश्यक सर्व कागदपत्रे सोबत बाळगावी.

अर्ज करतांना स्वत:चे नाव आधारकार्ड वरील नावप्रमाणेच असावे, ऑनलाईन अर्ज करतांना शिक्षण संस्था दिसत नसल्यास किंवा उपलब्ध नसल्यास याबाबत प्रकल्प कार्यालयास निदर्शनास आणून द्यावे. विद्यार्थ्यांनी ज्या महाविद्यालयास व अभ्यासक्रमास प्रवेश घेतला असेल तेच महाविद्यालय व अभ्यासक्रमांची निवड करावी. अर्ज भरतांना स्वत:चे नाव, लिंग, वसतीगृहाचे नाव व टक्केवारी योग्य प्रकारे नोंदवावी. शैक्षणिक गॅप असलेल्या, नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी वसतीगृह प्रवेशासाठी अर्ज सादर करु नये. वसतीगृह प्रवेशित विद्यार्थ्यांना निर्वाह भत्यांची रक्कम डीबीटी मार्फत संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात 3 महिन्यांची आगाऊ रक्कम जमा करण्यात येईल. विद्यार्थ्यांनी खोटे कागदपत्र,खोटी माहिती भरुन प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांवर कायदेशिर कार्यवाही करण्यात येईल. वसतीगृह प्रवेशासाठी निवड झाल्यास तसा निवड झाल्याचा संदेश आपल्या रजिष्टर मोबाईल क्रमांकावर येईल.त्यानंतर आपल्या युजर आयडी वरुन लॉगीन करुन ऑनलाईन प्रवेश पत्राची प्रिंट काढून संबंधित वसतीगृहास विहीत मुदतीत प्रवेश निश्चित करावा. नविन विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जांची प्रिंट वसतीगृह प्रवेश निश्चित झाल्यावरच स्विकारली जाईल. तोपर्यंत विद्यार्थ्यांने अर्जांची प्रिंट स्वत:जवळ ठेवावी. प्रवेशाबाबत अधिक माहितीसाठी संबंधित वसतीगृहावर संपर्क साधावा. असे आवाहन श्रीमती करनवाल यांनी केले आहे.