Home महाराष्ट्र संगीत आणि तंत्रज्ञानाचा संगम घडवणारा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम – मंत्री ॲड्. आशिष शेलार

संगीत आणि तंत्रज्ञानाचा संगम घडवणारा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम – मंत्री ॲड्. आशिष शेलार

0
A grand cultural program that brings together music and technology – Minister Adv. Ashish Shelar

मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘विरासत आणि विकास’ या संकल्पनेनुसार राज्य शासन काम करत आहे. महाराष्ट्राची समृद्ध परंपरा, कला, साहित्य, लोकसंगीत आणि संस्कृती आधुनिक पद्धतीने जगासमोर मांडण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले.महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरा, ऐतिहासिक वारसा आणि राष्ट्राभिमान यांचे भव्य व नेत्रदीपक दर्शन घडविणारा अभूतपूर्व ड्रोन शो मुंबई येथे आयोजित करण्यात आला, त्या कार्यक्रमाच्या उद्घाटनपर भाषणात ते बोलत होते. यावेळी मुख्य सचिव राजेश अग्रवाल, सचिव डॉ.किरण कुलकणी, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे तसेच या ड्रोन शोचा आनंद घेण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

महाराष्ट्र ही संतांची आणि वीरांची भूमी असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वातून प्रेरणा घेऊन सांस्कृतिक वारसा जपला जात असल्याचे मंत्री ॲङ शेलार यांनी नमूद केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील संस्कृती ही “सॉफ्ट पॉवर” म्हणून विकसित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील सांस्कृतिक कार्यक्रमांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आल्याची माहिती देताना मंत्री शेलार म्हणाले की, पूर्वी दरवर्षी 300-350 कार्यक्रम होत असताना आता 1200 हून अधिक कार्यक्रम राज्यभर आयोजित केले जात आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह इतर सहकाऱ्यांच्या मदतीने हा विस्तार साध्य झाल्याचे त्यांनी सांगितले.

यावर्षी गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आल्याचे जाहीर करत त्यांनी सांगितले की, देश-विदेशात, विशेषतः मॉरिशस येथेही सार्वजनिक गणेशोत्सवाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. तसेच गणेशोत्सवाला युनेस्को च्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

या कार्यक्रमात प्रथमच ड्रोन शोच्या माध्यमातून महाराष्ट्राचा नकाशा, छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन तसेच संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त विशेष सादरीकरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. हा उपक्रम प्रख्यात संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांच्या संकल्पनेतून साकारला असल्याचे त्यांनी नमूद केले.

शिवचरित्राची गाथा आकाशात उजळणार – सचिव डॉ.किरण कुलकर्णी

रामनवमीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेला आजचा कार्यक्रम भव्य, दिव्य आणि ऐतिहासिक असल्याचे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांनी केले. महाराष्ट्राच्या परंपरेचे वैभव आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा नव्या माध्यमातून उलगडण्याचा हा अनोखा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी डॉ. कुलकर्णी यांनी महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेचा उल्लेख करत छत्रपती शिवाजी महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या कार्याचा विशेष उल्लेख केला. त्यांच्या पराक्रम आणि कर्तृत्वाचे वर्णन करताना शब्द अपुरे पडतात, असे सांगत त्यांनी या महान व्यक्तिमत्त्वांविषयी असलेल्या आदरभावाला उजाळा दिला.

“छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याबद्दल किती लिहावे आणि किती बोलावे, असा प्रश्न पडतो. त्यांच्या पराक्रमाचे वर्णन करताना कागद कमी पडतो, शब्द थिटे पडतात,” असे त्यांनी नमूद केले.

या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र शासनाने आधुनिक माध्यमांचा वापर करत आकाशाच्या विशाल पटावर शिवचरित्र उलगडण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतल्याचे त्यांनी सांगितले. या माध्यमातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे दर्शन नागरिकांना अनुभवता येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

रामनवमी निमित्त आयोजित या कार्यक्रमात आकाशात चमचमणाऱ्या दिव्यांच्या माध्यमातून शिवकालीन पराक्रमाचे दृश्य साकारले जाणार असून, नागरिकांनी या अनोख्या अनुभवाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.