Home शैक्षणिक पूरग्रस्तांसाठी संवेदनशीलतेचा हात – परिवर्धेच्या चिमुकल्यांचा प्रेरणादायी उपक्रम

पूरग्रस्तांसाठी संवेदनशीलतेचा हात – परिवर्धेच्या चिमुकल्यांचा प्रेरणादायी उपक्रम

12
A hand of sensitivity for flood victims – An inspiring initiative by children from Parivardha

मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागात आलेल्या भीषण पुरपरिस्थितीने हजारो लोकांचे संसार, स्वप्नं आणि भविष्य उद्ध्वस्त केले आहे. घरं, शेती, शाळा, विद्यार्थ्यांची दप्तरं – सर्व काही पाण्यात वाहून गेलं. मात्र या कठीण प्रसंगी संवेदनशीलतेचा खरा अर्थ जिल्हा परिषद केंद्र शाळा, परिवर्धे येथील चिमुकल्यांनी कृतीतून दाखवून दिला.

ईश्वर कृपेने आपला भाग पुराने बाधित झाला नाही, पण त्यामुळे इतरांच्या वेदनांकडे डोळेझाक करण्याऐवजी या विद्यार्थ्यांनी ‘परोपकार हा बोलण्यात नव्हे तर कृतीत असावा’ हे आपल्या कृतीतून सिद्ध केलं.

चिमुकल्यांचा संवेदनशील उपक्रम:

परिवर्धे येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘मदत करा, पूरग्रस्तांना आधार द्या’ अशा घोषणांसह गावात भव्य मदत रॅली काढली. घराघरांत जाऊन निधी संकलन करताना विद्यार्थ्यांनी स्वतःच्या खाऊतून पैसाही दिला.

ग्रामस्थांनीही या चिमुकल्यांच्या संवेदनशीलतेला प्रतिसाद देत मोठ्या मनाने सहकार्य केलं. त्यांचे म्हणणे स्पष्ट होते – ‘आज दुसऱ्यावर संकट आहे, उद्या आपल्यावरही येऊ शकते. म्हणून माणूस म्हणून आपलं कर्तव्य निभावणं गरजेचं आहे.’

एकत्रित मदत आणि सुपूर्दगी:

विद्यार्थ्यांनी जमा केलेला ₹5,162/- (अक्षरी पाच हजार एकशे बासष्ट रुपये) इतका मदत निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय नमन गोयल यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. या प्रसंगी प्राथमिक शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे, उपशिक्षणाधिकारी मा. श्रीम. वंदना वळवी, डॉ. युनुस पठाण, रमेश गिरी, मुख्याध्यापक अमृत पाटील, तसेच शिक्षक उज्वला पाटील, सर्वजित पाडवी आणि पालक उपस्थित होते.

मा. सीईओ यांचेकडून विद्यार्थ्यांचे कौतुक:

मा. मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत सांगितले की, ‘शिक्षणाबरोबरच चांगले संस्कार घडवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. आज तुम्ही दाखवलेली संवेदनशीलता आणि समाजभावना ही खरी शिक्षणाची ताकद आहे.’

माणुसकीचा खरा धडा:

परिवर्धेच्या चिमुकल्यांनी दिलेला हा संदेश संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी आहे –

➡ परोपकार हा फक्त भाषणात नसावा, कृतीत असावा.

➡ आपण कोणाचं तरी स्वप्न पुन्हा उभं करू शकतो.

➡ कोणाच्या दुःखात हातभार लावणं हेच माणूसपणाचं खरं सार आहे.

या विद्यार्थ्यांच्या दातृत्वाला आणि ग्रामस्थांच्या संवेदनशीलतेला सलाम!

ज्यांच्या पर्यंत ही कहाणी पोहोचते त्यांनीही स्वतःला विचारावं – ‘मी कोणाच्या अश्रूंना आधार देऊ शकतो का?’

#socialresponsibility#HelpFloodVictims