
अमरावती येथील श्री संत गाडगेबाबा समाधीस्थळासाठी २५ कोटी आणि काटोल (जि. नागपूर) येथील भगवान श्री चक्रधर स्वामी मंदिर परिसरसाठी ४१.७५ कोटी अशा सुधारित विकास आराखड्यानुसार एकूण ११५ कोटींच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली. संतपरंपरेचे जतन करत आध्यात्मिक वारसा जपत धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी तीर्थक्षेत्रांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात यावा, आराखड्यातील सर्व कामे उत्सव काळातील भाविकांची संख्या लक्षात घेऊन दर्जेदार व निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
बैठकीस राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, राज्यमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर, आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार चरण सिंग ठाकूर, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता, प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराज व अन्य संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
श्री संत जनाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात श्री संत जनाबाई जन्मस्थळ परिसरात सांस्कृतिक सभागृह, गोदावरी घाट विकास, दर्शन मंडप, उद्यान व सुशोभीकरण, पाथवे, मंदिर ते घाट सिमेंट काँक्रीट रस्ता, गोरक्षण इमारत, संरक्षक भिंती, जलनिस्सारण व्यवस्था, विद्युत सुविधा, सार्वजनिक स्वच्छतागृहे, सौरऊर्जा, सीसीटीव्ही, पिण्याचे पाणी, लँडस्केपिंग आदी कामांचा समावेश आहे.
श्री संत गाडगेबाबा समाधीस्थळ आराखड्यात श्री संत गाडगे महाराज स्मृती केंद्र कल्चरल व्हॅल्यू एज्युकेशन सेंटरचे उर्वरित बांधकाम, श्री संत गाडगे महाराज स्मृति भवन परिसरामध्ये शेतकरी ग्राम सफाई मिशन सेंटर तळमजल्याचे बांधकाम करणे, यात्री निवासाच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्याचे बांधकाम, कीर्तन सभागृह, समाधी जीर्णोद्धार व सौंदर्यीकरण, ध्यान केंद्रासाठी इमारत, कुंताबाई समाधी सौंदर्यीकरण आदी सुविधांचा समावेश आहे.
भगवान श्री चक्रधर स्वामी मंदिर परिसर विकास आराखड्यात बहुउद्देशीय सभागृह, आधुनिक सार्वजनिक प्रसाधनगृह, भव्य प्रवेशद्वार, संरक्षक भिंत, वाहनतळ, बगीचा, कमानी पूल, पाथवे आणि इतर पर्यटन सुविधा विकसित करण्यात येणार आहेत.















