
शहादा तालुक्यातील कहाटूळ येथे कार्यरत असलेल्या “ग्रीष्मा मशरूम युनिट”ला मा.डॉ.मित्ताली सेठी, जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी भेट देत मशरूम उत्पादन प्रक्रिया, तंत्रज्ञानाचा वापर आणि उद्योग व्यवस्थापनाचा सविस्तर आढावा घेतला.
श्री. घनश्याम पाटील यांनी सप्टेंबर २०१९ पासून व्यावसायिक पद्धतीने सुरू केलेल्या या युनिटमध्ये दरवर्षी सुमारे १० टन फ्रेश मशरूम तसेच ड्राय मशीनद्वारे १ टन ऑइस्टर मशरूमचे उत्पादन घेतले जाते. युनिटमध्ये तयार होणाऱ्या स्पॉन (मशरूम बियाणे) ला देखील मोठी मागणी असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
या उद्योगासाठी लागणारा बहुतांश कच्चा माल स्थानिक पातळीवर उपलब्ध होत असल्याने उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होत आहे. गहू, गव्हाचे पेंढार (कुटार), स्पॉन, पॉलिथिन पिशव्या तसेच निर्जंतुकीकरणासाठी आवश्यक साहित्याचा प्रभावी वापर करून उत्पादन घेतले जाते.
ग्रीष्मा मशरूम युनिटमध्ये क्रॉपिंग रूम, तापमान नियंत्रण यंत्रणा, स्पॉन लॅब आणि पॅकेजिंग युनिट अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने उभारण्यात आले आहे. या प्रकल्पाला राष्ट्रीय फलोत्पादन विकास अभियानांतर्गत अळंबी उत्पादन व बीज उत्पादनासाठी सहाय्य प्राप्त झाले आहे.
मशरूम हा प्रथिनांचा उत्तम स्रोत असून त्यापासून विविध आरोग्यदायी पदार्थ तयार केले जातात. सध्या या युनिटमार्फत फ्रेश मशरूम, ड्राय मशरूम आणि मशरूम पावडरची विक्री केली जाते. तसेच गुजरात राज्यातील वलसाड येथे २० हजार किलो क्षमतेचे नवीन युनिट सुरू करण्यात आले असून ऑनलाईन मार्केटिंगचेही प्रयत्न सुरू असल्याची माहिती श्री.पाटील यांनी दिली.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांनी जिल्ह्यातील महिला बचत गट आणि युवकांना मशरूम उद्योगासाठी प्रशिक्षण, अभ्यास सहल आणि शासकीय योजनांद्वारे सहाय्य उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली.
तसेच फ्रेश मशरूमसाठी सब्जी कूलर, मशरूम वाळवणासाठी सोलर ड्रायर, प्री-कूलिंग तंत्रज्ञान आणि मूल्यवर्धित उत्पादनांच्या वापरावर भर देत आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
#MushroomFarming#Nandurbar#WomenEmpowerment#RuralEntrepreneurship#OysterMushroom#AgriBusiness#SelfEmployment#FarmInnovation#DistrictAdministration#Maharashtra#SustainableFarming#ValueAddition#StartupVillage#HealthyFood#AtmanirbharBharat















