
मुंबई – आंतरव्यावसायिक शिक्षण, तंत्रज्ञान, डिजिटल साधने आणि टीमवर्क यांच्या एकत्रित वापरातूनच प्रभावी, रुग्णकेंद्री आणि शाश्वत आरोग्यव्यवस्था उभी राहू शकते. याचबरोबर सर्व यंत्रणांच्या एकत्रित प्रयत्नांतूनच विकसित महाराष्ट्र आणि विकसित भारताची संकल्पना साकार होईल, असे मत ‘पल्स २०२६’ परिषदेमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले.
जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित ‘पल्स २०२६’ परिषदेत ‘एक्सप्लोरिंग इंटर प्रोफेशनल एज्युकेशन मॉडेल्स इन अलाईड हेल्थकेअर’ या सत्रात सहभागी तज्ज्ञ डॉक्टरांनी आरोग्य क्षेत्रातील विविध घटकांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज अधोरेखित केली. आंतरव्यावसायिक शिक्षण ही केवळ वैद्यकीय क्षेत्रापुरती मर्यादित संकल्पना नसून अभियांत्रिकी, जैवतंत्रज्ञान, फिजिओथेरपी, नर्सिंग यांसारख्या विविध क्षेत्रांतील समन्वयातून रुग्णकेंद्री आणि किफायतशीर आरोग्यसेवा उभारण्याचा मार्ग आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले.
या सत्रात सहभागी तज्ज्ञांमध्ये डॉ. डी. वाय. पाटील स्कूल ऑफ अलाईड हेल्थ सायन्सेस, पुणेचे संचालक डॉ.अभय सराफ, संचेती हॉस्पिटल अँड हेल्थकेअर अकादमीच्या प्राचार्य डॉ. राधा भट्टड, रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्स अँड सर्जन्स ऑफ ग्लासगोचे वरिष्ठ अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. संजीव मंजुरे, आयआयटी बॉम्बेचे प्रा. रोहित श्रीवास्तव, सिम्बायोसिस इंटरनॅशनल विद्यापीठाच्या डॉ. समिता जाधव यांचा सहभाग होता.
डॉ.अभय सराफ यांनी ग्रामीण आरोग्य व्यवस्थेच्या संदर्भात एएनएम, आशा आणि अंगणवाडी कार्यकर्त्यांना एकत्रित प्रशिक्षण देण्याची आवश्यकता अधोरेखित केली. कौशल्यवृद्धी, पुनर्कौशल्य आणि संसाधनांचा योग्य वापर यावर त्यांनी भर दिला. आंतरव्यावसायिक सहकार्य हे आरोग्यसेवेतील ‘फोर्स मल्टिप्लायर’ ठरू शकते, असे त्यांनी नमूद केले.
डॉ. राधा यांनी ‘आय ट्रीट’ ऐवजी ‘वुई को-मॅनेज’ हा दृष्टिकोन स्वीकारण्याचे आवाहन केले. बहुविद्याशाखीय टीमद्वारे उपचार केल्यास रुग्णांच्या जीवनात बदल घडू शकतो, असे त्यांनी उदाहरणाद्वारे स्पष्ट केले. भारतात अजूनही ‘सिलो’ पद्धतीमुळे उपचारात विलंब आणि रुग्णांचे असमाधान दिसून येते, असे त्यांनी सांगितले.
डॉ. रोहित श्रीवास्तव यांनी तंत्रज्ञान आणि वैद्यकीय शिक्षणाच्या एकत्रीकरणावर भर देत, वैद्यकीय अभ्यासक्रमात सेन्सर तंत्रज्ञान आणि पुनर्वसन अभियांत्रिकीसारख्या अभ्यासक्रमांचा समावेश करण्याची गरज व्यक्त केली. आयआयटी मुंबईत स्थापन करण्यात आलेल्या मेडिकल टेक्नॉलॉजी रिसर्च अँड इनोव्हेशन सेंटरच्या माध्यमातून संयुक्त पदवी अभ्यासक्रम राबविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तंत्रज्ञानाशिवाय विकसित महाराष्ट्राची संकल्पना पूर्ण होऊ शकत नाही, असे त्यांनी नमूद केले.
डॉ. समिता यादव यांनी जागतिक पातळीवरील विविध मॉडेल्सचा आढावा घेत, भारतात पदवी स्तरापासून आंतरव्यावसायिक शिक्षणाची अंमलबजावणी करण्याची गरज अधोरेखित केली. डिजिटल आरोग्य, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सिम्युलेशन प्रशिक्षणामुळे आरोग्यसेवा अधिक प्रभावी होऊ शकते, असे त्यांनी नमूद केले. आंतरव्यावसायिक शिक्षणामुळे वैद्यकीय चुका कमी होतात, संवाद सुधारतो आणि रुग्ण समाधान वाढते, असेही त्यांनी सांगितले.
डॉ. संजीव मंजुरे यांनी समन्वयित आरोग्य व्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित करत, भविष्यातील आरोग्यसेवा ही कनेक्टेड एक्सलन्सवर आधारित असेल, असे सांगितले. त्यांनी यूके, जर्मनी, डेन्मार्क, कॅनडा आणि सिंगापूरमधील मॉडेल्सचा संदर्भ देत, डिजिटल प्रणाली, डेटा शेअरिंग आणि बहुविद्याशाखीय टीम यामुळे आरोग्यसेवेची गुणवत्ता सुधारते, असे नमूद केले. राष्ट्रीय स्तरावर रुग्ण नोंदणी प्रणाली, समन्वयित आरोग्य केंद्रे आणि अनिवार्य आंतरव्यावसायिक प्रशिक्षण यांची अंमलबजावणी करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. विकसित भारत म्हणजे अधिक रुग्णालये नव्हे, तर एकमेकांशी जोडलेली आणि समन्वयाने कार्य करणारी आरोग्यव्यवस्था असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.















