
नंदुरबार | आधुनिक काळात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) सर्व क्षेत्रात प्रभावीपणे वापरली जात आहे. तळोदा तालुक्यातील शिक्षक व विद्यार्थी या प्रवाहात मागे राहतील असे नाही! माननीय जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नमन गोयल व शिक्षणाधिकारी श्री. भानुदास रोकडे यांच्या प्रेरणेतून गटशिक्षणाधिकारी श्री. शेखर धनगर, विस्तार अधिकारी श्री. वसंत जाधव व श्री. ज्ञानदेव केदार यांच्या मार्गदर्शनाखाली तळोदा तालुक्यातील प्राथमिक शाळांमध्ये AI चा वापर सुरू करण्यात आला आहे.
शाळानिहाय AI चा वापर:
⦁ जि.प.शाळा दलेलपूर – Gemini व Gemini Live च्या साहाय्याने विद्यार्थी गमतीशीर व ज्ञानवर्धक माहिती, ऐतिहासिक गोष्टी, भाषणे, चित्र निर्मिती, तसेच संभाषण कौशल्य विकसित करत आहेत.
⦁ जि.प.शाळा कढेल – विद्यार्थी ChatGPT द्वारे स्वनिर्मित प्रश्न विचारतात, गावाचे वर्णन, हवामान अंदाज यासारखी माहिती मिळवतात. Bing Image Creator द्वारे नवनवीन चित्रांची निर्मिती करतात.
⦁ जि.प.शाळा धवळीविहीर – “आपला परिसर – प्राणी” या घटकांतर्गत अॅनिमेशनच्या साहाय्याने प्राण्यांची ओळख मजेशीर पद्धतीने विद्यार्थ्यांना करून देण्यात आली.
⦁ जि.प.शाळा मालदा – Read Along व Story Viewer ॲपमुळे वाचनगतीत सुधारणा झाली. डिजिटल ग्रंथालयाच्या माध्यमातून सामूहिक वाचनाचा उपक्रम राबवला जात आहे.
⦁ जि.प.शाळा मोदलपाडा – अक्षरगटांवर आधारित शब्द, वाक्य AI च्या सहाय्याने तयार करून विद्यार्थ्यांचा वाचन सराव अधिक प्रभावी करण्यात आला.
⦁ जि.प.शाळा तऱ्हावद – ऑडिओ स्टोरीज, गटवाचन, शब्दखेळ, चित्राधारित लेखन व AI द्वारे शब्ददुरुस्ती वापरून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास व लेखनकौशल्य वाढवले जात आहे.

विद्यार्थ्यांमध्ये नवे बदल:
या उपक्रमामुळे विद्यार्थी लहान वयातच Prompt Engineering शिकू लागले आहेत. त्यांच्या भाषिक कौशल्यात वाढ, आत्मविश्वासात वृद्धी, शब्दसंपत्तीत भर तसेच एकविसाव्या शतकातील आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता विकसित होत आहे.
तळोदा तालुक्यातील हा प्रयोग शिक्षणक्षेत्रात एक नवा आदर्श ठरत असून ‘AI हा विद्यार्थ्यांचा जिवलग मित्र’ ठरत आहे.
#AIinEducation#digitallearningplatform#nandurbar#taloda#FutureReady