भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) आधारशी संबंधित समस्या, प्रश्न आणि तक्रारींचे निराकरण करण्यासाठी 1947 क्रमांकाची ‘टोल-फ्री हेल्पलाइन’ म्हणजेच दूरध्वनीमार्फत मोफत मदतसेवा सुरु केली आहे. ही हेल्पलाइन सार्वजनिक सेवा सुव्यवस्थित करण्यासाठी आणि नागरिकांना अखंड सहाय्य प्रदान करण्यासाठी, चोवीस तास सुरु राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना त्वरित सहाय्य मिळविण्यासाठी सोयीची ठरणार आहे. ( aadhar card toll free number )
आधार कार्ड टोल फ्री हेल्पलाइन : आठवड्याचे सर्व दिवस चोवीस तास स्वयं सहाय्य पद्धतीने (सेल्फ सर्व्हिस) उपलब्ध
ही परिचलन स्वयं सहाय्य सेवा आठवड्याचे सर्व दिवस चोवीस तास स्वयं सहाय्य पद्धतीने (सेल्फ सर्व्हिस) उपलब्ध आहे. टोल-फ्री हेल्पलाइन 1947 ही नागरिकांचे आधारशी संबंधित विविध प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. जन्मतारीख, नाव, मोबाईल क्रमांक किंवा पत्ता यासारखे वैयक्तिक तपशील अद्ययावत करणे असो, की पीव्हीसी कार्डबद्दल माहिती शोधणे असो, ही हेल्पलाईन, आधार बाबतच्या कोणत्याही चौकशीसाठी सर्वसमावेशक उपाय आहे. त्याशिवाय, या हेल्पलाईनच्या मदतीने नागरिकांना त्यांच्या EID/UID ची सद्यःस्थिती तपासता येईल, घर नोंदणी सेवांसाठी सहाय्य मिळेल, आणि अद्ययावतीकरणाची विनंती फेटाळली गेली, तर त्यामागचे कारण समजू शकेल.
आधार कार्ड टोल फ्री हेल्पलाइन : मोबाईल फोनवरून 1947 क्रमांक डायल करा
या सेवेचा वापर करण्यासाठी, नागरिक त्यांच्या लँडलाइन किंवा मोबाईल फोनवरून 1947 क्रमांक डायल करू शकतात. ही हेल्पलाईन 12 भाषांमधील संवादासाठी सक्षम असून, सहाय्य मिळवण्यासाठी भाषेचा अडथळा ठरणार नाही, हे सुनिश्चित करते. वापरकर्त्यांकडे स्वयंचलित IVRS प्रणाली द्वारे मार्गदर्शन मिळवण्याचा किंवा वैयक्तिक सहाय्य मिळवण्यासाठी आधार केअर एक्झिक्युटिव्हशी थेट संपर्क साधण्याचा पर्याय उपलब्ध असेल. ( aadhar card toll free number )
अद्ययावतीकरणाची विनंती नाकारली गेली, तर 1947 क्रमांकार कॉल करून नकाराचे कारण जाणून घेता येईल, आणि पुन्हा विनंती करण्यापूर्वी आवश्यक ती सुधारणा करण्याचा मार्ग उपलब्ध राहील. कॉल केल्यावर, नागरिकांना एसएमएसद्वारे संवाद क्रमांक त्वरित जारी केला जातो, ज्याच्या सहाय्याने ते आपल्या तक्रार निवारणाबाबतच्या प्रगतीचा मागोवा घेऊ शकतील. याशिवाय, आधार कार्ड एक्झिक्युटिव्हबरोबर हा संवाद क्रमांक सामायिक करून तक्रारीची सद्यःस्थिती तपासता येईल.
ज्यांना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून संवाद करायचा आहे, त्यांना आपले प्रश्न, अभिप्राय, सूचना आणि तक्रारी देखील पुढील ईमेलवर पाठवता येतील.
त्याशिवाय पुढील अधिकृत पोर्टलवर ऑनलाइन तक्रार दखल करता येईल:
https://myaadhaar.uidai.gov.in/file-complaint.