Home महाराष्ट्र प्रत्येक जिल्ह्यात पत्रकारांसाठी ‘एआय’ प्रशिक्षण कार्यशाळा घेणार – कौशल्य, रोजगार, उद्योजकता व...

प्रत्येक जिल्ह्यात पत्रकारांसाठी ‘एआय’ प्रशिक्षण कार्यशाळा घेणार – कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा

1
‘AI’ training workshops will be held for journalists in every district – Minister for Skill, Employment, Entrepreneurship and Innovation Mangal Prabhat Lodha

मुंबई : प्रत्येक क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर आणि त्याचे महत्व लक्षात घेऊन  कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे पत्रकारांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक कार्यशाळा हा नवा उपक्रम राबवला राबविण्यात येत असून कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात पत्रकारांसाठी विशेष एआय प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात येणार असल्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.

रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मंत्रालय येथील पत्रकार कक्षात एआय संदर्भात चार दिवसीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले. समारोप कार्यक्रमात रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.अपूर्वा पालकर, एआय तज्ज्ञ किशोर जशनानी, उपकुलसचिव राजेंद्र तलवारे, मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, सरचिटणीस दिपक भातुसे, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे  प्रशिक्षक लोमेश नारखेडे, सल्लागार गजानन हेगडे, वरिष्ठ सल्लागार आशिष श्रीवास्तव, प्रशासकीय सहाय्यक ऋषी देठे, शॉर्ट टर्म कोर्सेसचे शुभम शेंडे, श्रावणी कोचरे, भूषण पवार तसेच प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल माध्यमांचे पत्रकार उपस्थित होते.

११ ते १४ नोव्हेंबर २०२५ दरम्यान मंत्रालयात आयोजित या कार्यशाळेत  एआय साधनांचा पत्रकारितेसाठी वापर, वृत्ताची पडताळणी, माहिती शोधण्याची गती, तसेच डिजिटल कामकाजातील अचूकता आणि सुलभता याविषयी पत्रकारांना मार्गदर्शन मिळाले. या प्रशिक्षणाला पत्रकारांकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता हा उपक्रम राज्यभर नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हा व तालुका स्तरावर काम करणाऱ्या पत्रकारांना आधुनिक एआय साधनांची ओळख आणि त्यांचा वापर प्रत्यक्ष शिकण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

या निर्णयाबद्दल कौशल्य मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले, “आज प्रत्येक पत्रकारावर बातमीच्या वेगासोबतच तिची अचूकता टिकवण्याची जबाबदारी वाढली आहे. अशावेळी एआय ही केवळ तांत्रिक सुविधा नाही, तर कामाला नवी धार देणारे साधन आहे. राज्यातील प्रत्येक पत्रकार अधिक सक्षम व्हावा, हा या उपक्रमामागचा उद्देश आहे. या माध्यमातून पत्रकारांद्वारे जनतेचे प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडले जातील आणि हेच या उपक्रमाचे खरे यश ठरेल”, राज्यात अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम असून याचबरोबर रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठात ‘एआय फॉर न्यूज’ या विषयाचा चार महिन्यांचा डिप्लोमा अभ्यासक्रम सुरू करण्याची सूचना आली असून याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल, असेही श्री.लोढा यांनी सांगितले.

चार दिवसीय कार्यशाळेत कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ञ किशोर जशनानी यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता वापरताना द्यायचे प्रॉम्प्ट, चॅट जीपीटीला असलेले पर्याय, त्याचप्रमाणे पत्रकारितेसाठी इतर सहायक टूल्स बनविणे. फोटोवरून बातमी करणे, फोटोवरून व्हिडिओ लेखन बनविणे, न्यूज रिपोर्ट बनविणे,  प्रिंट, इलेक्ट्रॉनिक व  डिजिटल मीडियासाठी बातमी लेखन त्याचप्रमाणे चॅट पीडीएफ चा वापर याबाबत माहिती दिली.

रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. अपूर्वा पालकर म्हणाल्या की, ‘एआय’ फॉर न्यूज या विषयाचा डिप्लोमा सुरू करण्याची सूचना आली असून याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल. कृत्रिम बुद्धिमत्ता ही कार्यशाळा सर्व पत्रकारांना त्यांच्या दैनदिन कामात अत्यंत उपयुक्त ठरेल. पत्रकारांचा या कार्यशाळेला खूप चांगला प्रतिसाद मिळाला.

एआय पत्रकारिता कार्यशाळेमध्ये सहभागी झालेल्या पत्रकारांना मान्यवरांच्या हस्ते सहभागी प्रमाणपत्र वितरित करण्यात आले

पत्रकार दीपक कैतके, संजय जोग, क्लारा लुईस यांनी चार दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेविषयी मनोगत व्यक्त केले.

मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे यांनी आभार मानले. सरचिटणीस दीपक भातुसे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यकारिणी सदस्य खंडूराज गायकवाड यांनी कार्यक्रमाचे समन्वयन केले.