Home महाराष्ट्र पेट्रोल-डिझेल व गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे; नागरिकांनी संयम...

पेट्रोल-डिझेल व गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे; नागरिकांनी संयम पाळून अफवांपासून दूर राहावे : कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन

1
All agencies should work in coordination to ensure smooth supply of petrol, diesel and gas; Citizens should exercise restraint and stay away from rumours: Kumbh Mela Minister Girish Mahajan

नाशिक: जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसची वाढती मागणी लक्षात घेता पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासन, तेल कंपन्या व वितरकांनी समन्वयाने कार्य करावे. कोणत्याही आफवांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी अनावश्यक गर्दी व इंधन साठेबाजी टाळून संयम बाळगावा, असे आवाहन  कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात पेट्रोल-डिझेल व गॅस सिलेंडर वितरक, कंपनीचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मंत्री श्री. महाजन बोलत होते. यावेळी महापौर हिमगौरी आडके-आहेर,  महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, सहाय्यक  जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड यांच्यासह विविध तेल कंपन्या, गॅस वितरक यांचे प्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते.

मंत्री महाजन म्हणाले की, सध्या पेट्रोल-डिझेलची मागणी दीडपट वाढल्यामुळे काही ठिकाणी तात्पुरती कृत्रिम टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता इंधन साठविणे टाळावे. कोणत्याही स्वरूपाचे वाद होणार नाहीत यादृष्टीने पंपावरील कर्मचाऱ्यांनी ग्राहकांशी नम्रतेने व संयमाने वागण्याच्या सूचना मंत्री श्री. महाजन यांनी दिल्या.

दक्षता पथकाच्या कारवाईत आवश्यक ती शिथिलता आणून नागरिकांना दिलासा देण्यात आला आहे. पुरवठा नियमित झाल्यास प्रतीक्षा यादी निश्चितच कमी होईल. वेल्डिंग इंडस्ट्री, ऑटोमोबाईल संबंधित काही उद्योगांवर तात्पुरता परिणाम झाला असल्याचे जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी नमूद केले.घरपोच सिलिंडर वितरणास विलंब होत असून बायोमेट्रिक ई-केवायसी झालेल्या ग्राहकांना प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्लांट सुट्टीच्या दिवशी बंद राहत असल्याने वितरणावर परिणाम होत आहे. ओटीपी-आधारित वितरण पद्धत प्रभावीपणे राबविल्यास गर्दी कमी होऊ शकते, असे गॅस वितरकांनी बैठकीत सांगितले. घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत आहे, मात्र व्यावसायिक सिलिंडरमध्ये काही प्रमाणात अडचणी आहेत. अतिरिक्त पुरवठा केल्यास प्रतीक्षा यादी कमी होण्यास मदत होईल असे तेल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले

पेट्रोल-डिझेल वितरकांनी बैठकीत पुढील मागण्या मांडल्या :

  • ऑईल कंपन्यांकडील क्रेडिट सुविधा पुन्हा सुरू करावी
  • आगाऊ रक्कम भरल्यानंतर तात्काळ टँकर उपलब्ध करून द्यावेत
  • रविवारीही डेपो सुरू ठेवावेत
  • पंपांवर पोलीस संरक्षण द्यावे

अफवांमुळे निर्माण झालेली परिस्थिती

नेहमीपेक्षा अधिक पुरवठा करूनही अफवांमुळे काही तासांतच इंधन संपत आहे. काही ठिकाणी साठेबाजीमुळेही ताण वाढला आहे. प्रत्यक्षात पुरवठा पुरेसा असून नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी असे कंपनी प्रतिनिधींनी यावेळी सांगितले.