अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई यांच्यावतीने घेण्यात येणाऱ्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत (गायन) या विषयातील संगीत विशारद परीक्षेत अमळनेर (जि. जळगाव) येथील कु. अनोखी गुरव हिने मुंबई केंद्रातून प्रथम क्रमांक मिळवत राज्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
कु. अनोखी गुरव ही संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध शहनाई वादक स्व. वसंतराव गुरव यांची नात असून, शहनाई वादनाचा वारसा समर्थपणे पुढे नेणारे प्रसिद्ध कलाकार प्रबल उर्फ चिमु गुरव यांची सुकन्या आहे. संगीत परंपरेचा वारसा जपत तिने गायन क्षेत्रात स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे.
या कठीण परीक्षेत तिने सभागायनात “शुद्ध कल्याण” राग आणि उपशास्त्रीय प्रकारात ठुमरी सादर करून परीक्षकांना मंत्रमुग्ध केले. वयाच्या अवघ्या सातव्या वर्षापासून संगीत शिक्षणास सुरुवात करून, पूर्व प्राथमिक ते विशारद अशा आठ स्तरांच्या परीक्षांमध्ये सलग ‘विशेष योग्यता’ प्राप्त करत तिने डिसेंबर 2025 मध्ये 17व्या वर्षी संगीत विशारद ही पदवी मिळवली आहे.
या यशाबद्दल राज्यभरातून तिचे अभिनंदन होत असून, या यशाचे संपूर्ण श्रेय तिने आपल्या गुरूंना, आई-वडील व कुटुंबीयांना दिले आहे. गुरव कुटुंबाचा समृद्ध संगीत वारसा पुढील पिढीतही तेजस्वीपणे पुढे नेत असल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
















