Home महाराष्ट्र जिल्हा युवा पुरस्कारासाठी १९ जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

जिल्हा युवा पुरस्कारासाठी १९ जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

0
Appeal to apply for District Youth Award by January 19

मुंबई : आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवक–युवतींमुळे समाजात युवाशक्तीची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. युवकांना मानव संसाधन विकासाचा प्रमुख स्रोत मानले जात असून विकास प्रक्रियेत त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. या अनुषंगाने राज्याच्या युवा धोरण २०१२ नुसार राज्य व जिल्हास्तरावर युवा पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

मुंबई शहर जिल्ह्यातील पात्र युवक, युवती व संस्थांनी २०१९-२० ते २०२४-२५ या कालावधीसाठी जिल्हा युवा पुरस्कारासाठी १९ जानेवारी २०२६ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन मुंबई शहराचे जिल्हा क्रीडा अधिकारी मार्क धरमाई यांनी केले आहे.

पुरस्कारासाठीचे अर्ज भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल, दुसरा मजला, जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई शहर कार्यालय, धारावी येथे सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

समाजातील दुर्बल घटक, अनुसूचित जाती-जमाती, आदिवासी भाग, तसेच शिक्षण, रोजगार, आरोग्य, पर्यावरण, संस्कृती, कला, क्रीडा, विज्ञान-तंत्रज्ञान, उद्योग, महिला सक्षमीकरण, स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंध, व्यसनमुक्ती आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवक, युवती व संस्थांना जिल्हास्तरावर जिल्हा युवा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी इच्छुकांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी 9594369561 या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.