Home महाराष्ट्र भुसावळ बस पोर्टबाबत वस्तुस्थिती तपासून कार्यवाही – मंत्री दादाजी भुसे

भुसावळ बस पोर्टबाबत वस्तुस्थिती तपासून कार्यवाही – मंत्री दादाजी भुसे

13

मुंबई, दि. 18 : भुसावळ हे  रेल्वेचे मोठे जंक्शन असून याठिकाणी असणाऱ्या बस स्थानकावरही प्रवाशांसाठी आवश्यक सोयीसुविधा असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने याठिकाणी बस पोर्ट उभारण्याबाबत वस्तुस्थिती तपासून कार्यवाही केली जाईल, असे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)  मंत्री दादाजी भुसे यांनी आज विधानसभेत सांगितले.

सदस्य संजय सावकारे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावेळी मंत्री श्री. भुसे बोलत होते.

राज्यात सध्या एकूण 598 बसस्थानके आहेत. त्यापैकी 109 बसस्थानकांचा पुनर्विकास करण्यात आला आहे. सध्या 63 कामे सुरु असून 97 कामे प्रस्तावित आहेत. याशिवाय राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने विविध सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करुन दिल्या आहेत. बसस्थानके चांगली करणे आणि त्याठिकाणी आवश्यक सोयीसुविधा देण्यावर राज्य शासनाचा भर आहे. भुसावळ येथेही बस पोर्ट उभारण्याबाबत यापूर्वी काही कार्यवाही झाली असेल तर ती वस्तुस्थिती तपासून त्याप्रमाणे निर्णय घेतला जाईल.

राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात लवकरच इलेक्ट्रीक बसेस दाखल होतील. त्यातील काही बसेस भुसावळ येथे उपलब्ध करुन देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करु, असे मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.

या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत सदस्य बळवंत वानखेडे यांनीही सहभाग घेतला.