Home आरोग्य आरोग्य पर्यटनाअंतर्गत राज्यात दंतोपचाराला मोठी संधी – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री...

आरोग्य पर्यटनाअंतर्गत राज्यात दंतोपचाराला मोठी संधी – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर

2
Big opportunity for dental treatment in the state under health tourism – Public Health and Family Welfare Minister Prakash Abitkar

मुंबई: महाराष्ट्र शासन आरोग्य पर्यटनाला चालना देणार असून, राज्यात विशेषतः मुंबईत असलेल्या पायाभूत सुविधा, कुशल तज्ज्ञ आणि कमी खर्चातील सेवा यामुळे दंत उपचाराला आरोग्य पर्यटनाच्या क्षेत्रात मोठी संधी असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.

इंडियन डेंटल असोसिएशन (आयडीए) तर्फे स्थापन करण्यात आलेल्या डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम एज्युकेशन, रिसर्च अँड इन्क्युबेशन सेंटर (प्रभादेवी, मुंबई) येथे सार्वजनिक आरोग्य मंत्री आबिटकर यांनी भेट देऊन केंद्राची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते.

सार्वजनिक आरोग्य मंत्री आबिटकर म्हणाले की, दंतोपचारसेवेची जागतिक मागणी वाढत आहे. आंतरराष्ट्रीय रुग्णांना आकर्षित करण्यासाठी जागतिक दर्जाची सेवा मुंबईत आहे. इंडियन डेंटल असोसिएशन गिनीजबुक मध्ये रेकॉर्ड असलेली जागतिक दर्जाची संस्था गेली 78 वर्षे चांगली सेवा देत आहे. संशोधन आणि प्रशिक्षण क्षेत्रात आयडीए चे काम उत्तम आहे. राज्य शासन आणि इंडियन डेंटल असोसिएशन मिळून दंत आरोग्य जनजागृती, प्रतिबंधात्मक कार्यक्रम, संशोधन आणि कौशल्यविकास या क्षेत्रात काम करता येईल, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री आबिटकर यांचे स्वागत आयडीएचे मानद सरचिटणीस डॉ. अशोक धोबळे यांनी केले व अत्याधुनिक सुविधांची सविस्तर माहिती दिली. डॉ. अशोक धोबळे म्हणाले की, मंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. या भेटीने प्रत्येक नागरिकापर्यंत दर्जेदार आरोग्यसेवा पोहोचविण्याचा आमचा संकल्प अधिक दृढ झाला आहे.

‘हेल्दी स्माईल मिशन २०२५’ अंतर्गत महाराष्ट्र शासन आणि इंडियन डेंटल असोसिएशन यांनी एकत्रितपणे दंत आरोग्य सुधारणा व प्रतिबंधात्मक सेवा देण्याचा संकल्प केला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.