Home महाराष्ट्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यातील महाराष्ट्र दालनाला भेट दिली स्टॉलधारकांशी...

मुख्यमंत्री फडणवीस यांनी भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यातील महाराष्ट्र दालनाला भेट दिली स्टॉलधारकांशी संवाद; उत्पादनांची पाहणी

2
Chief Minister Fadnavis visited the Maharashtra pavilion at the India International Trade Fair, interacted with stall holders; inspected the products

नवी दिल्ली : प्रगती मैदान येथे सुरू असलेल्या ४४व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यातील महाराष्ट्र दालनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भेट दिली.

भारत व्यापार वृद्धी संस्थेच्या (आयटीपीओ) मार्फत आयोजित या मेळाव्यात महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाने ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या संकल्पनावर आधारित महाराष्ट्र दालनाची उभारणी केली आहे. हे दालन 1098 चौरस मीटर क्षेत्रात पसरलेले असून, त्याची रचना छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारशावर आधारित आहे. १४ नोव्हेंबरपासून सुरू झालेला हा मेळा २७ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. यावेळी महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अनबलगन, महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला, महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विकास पानसरे, सहव्यवस्थापकीय संचालक प्रशाली दिघावकर उपस्थित होते. दालनाचे उद्घाटन आज सकाळी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले.

मुख्यमंत्र्यांनी दालनातील महाराष्ट्र राज्य हस्तकला आणि हातमाग महामंडळ, विविध स्वयंसहाय्यता गट, मराठी भाषा दालन, पैठणी कारागीर तसेच इतर स्टॉल्सची सविस्तर पाहणी केली. पैठणी साड्या, कोल्हापुरी चप्पल, चामड्याच्या वस्तू, घरसजावटीच्या वस्तू, हॅंड पेंटिंग, ऑरगॅनिक उत्पादने, काथ्यापासून बनवलेल्या वस्तू, खादी आणि बांबूच्या वस्तू तसेच बचत गटातील महिलांनी बनवलेले खाद्यपदार्थ आदी वस्तू प्रदर्शित करणाऱ्या स्टॉल्सना त्यांनी भेट दिली. स्टॉलधारकांशी संवाद साधून उत्पादनांची माहिती घेतली. पैठणी स्टॉलवर महिलांशी चर्चा केली.

राष्ट्रीय राजधानीत राज्याच्या उत्कृष्ट उत्पादनांचे प्रदर्शन करण्यासाठी उद्योग विभागाच्या प्रयत्नांचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी कौतुक केले. उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अनबलगन यांनी मेळा संकल्पना आणि उद्योग विभागाने केलेली कार्यवाही याची माहिती दिली. निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी मेळाव्यात प्रदर्शित विविध उत्पादने व उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.

या मेळाव्यात झारखंडला फोकस राज्याचा दर्जा देण्यात आला असून, उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र आणि राजस्थान या चार राज्यांना भागीदार राज्य म्हणून विशेष दर्जा प्राप्त झाला आहे.

00000000

महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली – वृत्त विशेष -246

एक्स वर आम्हाला फॉलो करा:

https://x.com/MahaGovtMic /https://x.com/micnewdelhi / https://x.com/MahaMicHindi