महिला व बालविकास विभाग आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने बालकांच्या मानसिक, शारीरिक आणि कौंटुबिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी राज्यातील अंगणवाड्यामंध्ये पालक मेळावा आयोजित करण्यात येतो. याचा सकारात्मक परिणाम होताना दिसतो. आरंभ या कार्यक्रमाच्या तीन मुख्य व्यासपीठांपैकी एक म्हणजे पालक मेळावा. घरभेटी आणि मातामंडळ बैठकांबरोबरच पालक मेळाव्याचा उद्देश म्हणजे संपूर्ण समुदायाने एकत्र शिकणे आणि मुलांच्या संगोपनाबद्दल आई बरोबर वडील आणि कुटुंबातील सदस्यांनी जागरूक होणे आवश्यक आहे.
महिला व बालविकास विभागामार्फत महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना राबवल्या जातात. याप्रमाणे युनिसेफ ही संयुक्त राष्ट्रसंघाची एक संस्था आहे जी मुले आणि मातांची कल्याणासाठी काम करते. तिचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे, जगभरातील मुलांना अन्न, आरोग्य सेवा, शिक्षण आणि संरक्षण उपलब्ध करून देणे, आपत्ती, युद्ध किंवा दारिद्र्यग्रस्त भागातील मुलांना मदत करणे, लसीकरण, स्वच्छ पाणी आणि शिक्षणाच्या कार्यक्रमांद्वारे मुलांचे जीवन सुधारणे यासाठी १९४६ साली दुसऱ्या महायुद्धानंतर युद्धग्रस्त देशांतील मुलांना मदत करण्यासाठी ही संस्था स्थापन करण्यात आली.
लहान मुलांना खेळ, संवाद आणि सुरक्षित वातावरणापासून ते त्यांच्या आहारापर्यंत माहिती सांगणारे स्टॉल्स, खेळणी, शारीरिक, बौद्धिक, भावनिक आणि सामाजिक विकासासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींबद्दल माहिती देण्याचे काम अंगणवाडी कर्मचारी, आरोग्य, आशा ताई करत आहेत. प्रत्येक बालकाच्या उत्तम वाढीसाठी पहिले हजार दिवस सुवर्णमयी असतात. त्यात पालक, घरातील सदस्याचा सहभाग अत्यावश्यक असतो. त्यामुळे पालकांशी मनमोकळा संवाद साधण्यासाठी महिला व बालविकास विभाग युनिसेफच्या समन्वयाने आईबरोबर वडिलांनीही बालकाला सांभाळण्याची जबाबदारी घ्यावी याचबरोबर घरातील सदस्यांचीही तेवढीच जबाबदारी असल्याचे प्रबोधन या पालक मेळाव्याच्या माध्यमातून करण्यात येते.
“अनेकदा मी मुलांना काहीही करण्यापासून रोखते, त्यांना ओरडते. त्यामुळे मुले तात्पुरती गप्प बसतात. पण पालक मेळाव्याच्या माध्यमातून हे समजले की मुलांना कायम नकारात्मक प्रतिक्रिया देऊन त्यांच्या वाढीवर परिणाम होतो. त्यांना त्यांच्या पद्धतीने गोष्टी करू दिल्या तर त्यांची बौद्धिक वाढ उत्तम होते.” अशी प्रतिक्रिया अंगणवाडीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या पालकाने दिली.
अंगणवाड्यांचे समूह एकत्रित करून त्यांच्या पालकांना मेळाव्याच्या माध्यमातून एकत्र करण्यात येते. या मेळाव्याच्या माध्यमातून मुलांच्या विकासात सुधारणा, कुटुंब आणि समुदाय सशक्त करणे, बाल संगोपनाबद्दल समुदाय जागरूकता वाढवणे, अंगणवाडी आणि आशा ताईंची भूमिका अधिक बळकट करणे, समग्र बालकांच्या काळजीबाबत दृष्टीकोन तयार करणे, समुदायाचा सहभाग आणि आत्मविश्वास वाढविणे, सातत्याने टिकणाऱ्या बालकांच्या पद्धतींचा प्रसार करण्याचे काम करण्यात येते.
या मेळाव्यात दोन वर्षे वयोगटापर्यंत मुलांसाठी वयोगटानुसार खेळणी आणि शैक्षणिक साहित्य दाखवले जाते, दोऱ्यांचे जुने पुंजके, साबणाचे बॉक्स, कागदी डबे या वापरलेल्या वस्तूंपासून तयार केलेल्या खेळांच्या माध्यमातून मुलांच्या पाचही इंद्रियांचा विकास करणे हा उद्देश होय. दोऱ्यांचे वापरलेले रिळ, टाकून दिलेली झाकणे, पुठ्ठा, बांगड्या, साबणाचे रिकामे कागदी डब्बे यापासून बनवलेली तोरणं, माळा, रंगीत खेळणी मुलांना मेळाव्यात खिळवून ठेवतात. खेळणाऱ्या मुलांबरोबर त्यांची आई आणि इतर पालकांचाही समावेश होतो. काही खेळ हे पालकांसाठी असतात.
या मेळाव्याच्या माध्यमातून बालकांशी संवाद साधण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. मुलांना विविध मुखवटे व टोपी घालून त्यांना आरशासमोर उभे केले जाते. जेणेकरून त्यांना स्वत:चा चेहरा पाहता येतो. अशा विविध उपक्रमाच्या माध्यमातून संवाद वाढवणे, मेंदूचा विकास, सामाजिक आणि भावनिक वाढ होण्यास मदत होते. याचबरोबर ब्रेन वायरिंग खेळाच्या माध्यमातून खेळ अनुभव आणि संवेदनाच्या आधारे मेंदूच्या न्यूरल कनेक्शनच्या निर्मिर्तीचे महत्त्व समजावतो. मुलाचा मेंदू पहिल्या १००० दिवसात सर्वाधिक वाढते म्हणून या काळात स्पर्श, संवाद आणि खेळ यावर भर दिला जातो. पालक मेळाव्यात मुलांसाठी बाहूली घर तयार केले जाते. यामध्ये कल्पनाशक्तीचा वापर करून खेळ खेळवले जातात. यामुळे त्यांच्या सामाजिक, भावनिक आणि बौद्धिक विकासाला चालना मिळते. पौष्टिक पोषण अंतर्गत सहा महिन्यांपर्यंत आणि त्यानंतरचे अन्न कसे असावे हे दाखवले जाते. तसेच जंक फुडचे दुष्परिणाम आणि स्थानिक फळभाज्यांचा उपयोग सांगितला जातो.
याचबरोबर आरोग्याची जनजागृती कार्यक्रमात लसीकरणाचे वेळापत्रक, स्वच्छता, आयर्न-फॉलिक ॲसिडचे महत्व, ॲनिमिया प्रतिबंध इत्यादी माहिती वैद्यकीय अधिकारी, आशा वर्कर यांच्यामार्फत करण्यात येते.
पालक हेच मुलांचे पहिले शिक्षक असतात, तीन वर्षांच्या वयातील विकास हा आयुष्यभरासाठीचा पाया घालतो. मुलांशी संवाद, प्रेम आणि संधी दिल्यास त्यांचा मेंदू, लक्ष आणि स्मरणशक्ती जलद वाढते. प्रोत्साहन हेच सर्वांत मोठे शिक्षण आहे.
श्रद्धा मेश्राम,
विभागीय संपर्क अधिकारी,
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय
















