
(नंदुरबार) जिल्ह्यामध्ये कीटकजन्य आजारांचे, विशेषतः डेंग्यूचे रुग्ण नियमित स्वरूपामध्ये आढळून येत आहेत. जिल्ह्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यानंतर डेंग्यूच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याचे दिसून येते. या पार्श्वभूमीवर 16 मे 2026 या ‘राष्ट्रीय डेंग्यू दिवसाचे’ औचित्य साधून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र सोनवणे यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि वैयक्तिक व सामुदायिक पातळीवर डास प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचे आवाहन केले आहे.
वाढत्या डेंग्यूची प्रमुख कारणे:
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील काही भागांत झालेली अतिवृष्टी, तर काही भागांतील पाण्याचे दुर्भिक्ष्य, वाढते शहरीकरण, नागरिकांचे स्थलांतर आणि विविध भागात सुरू असलेली विकासकामे यांमुळे डेंग्यूचा प्रसार करणाऱ्या डासांची उत्पत्ती वाढून रुग्णसंख्या वाढत आहे.
दिवसा आणि वारंवार चावतो ‘एडीस इजिप्ती’ डास:
डेंग्यू हा एक विषाणूजन्य आजार असून त्याचा प्रसार ‘एडीस इजिप्ती’ या डासामुळे होतो. हा डास गडद काळ्या रंगाचा असतो आणि त्याच्या पंखांवर व पायांवर पांढऱ्या रंगाचे ठिपके असतात. हा डास प्रामुख्याने दिवसा आणि एकाच वेळी वारंवार चावतो. या डासांची उत्पत्ती घरात साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होत असल्याने नागरिकांनी पाणी व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
डेंग्यू तापाची प्रमुख लक्षणे:
• तीव्र डोकेदुखी.
• डोळ्यांच्या खोबणीत असह्य वेदना.
• तीव्र सांधेदुखी.
• अंगावर लाल रंगाचे पुरळ येणे.
• भूक मंदावणे व उलट्या होणे.
• गंभीर परिस्थितीत उलट्यातून रक्त पडणे.
• तोंडाला सतत कोरड पडणे व पोट दुखणे.
• रक्तमिश्रित काळसर रंगाची संडास होणे.
डास प्रतिबंधासाठी आरोग्य विभागाचे 11 कलमी आवाहन:
• घरातील पाणी साठवण्याची सर्व भांडी आठवड्यातून किमान एकदा घासून-पुसून कोरडी करावीत.
• सर्व भांडी हवाबंद झाकणाने किंवा कापडाने डास आत जाणार नाहीत अशी घट्ट झाकावीत.
• आठवड्यातून एक दिवस अनिवार्यपणे “कोरडा दिवस” म्हणून पाळावा.
• हौद, बॅरल, गच्चीवरील पाण्याच्या टाक्यांना घट्ट झाकणे बसवावीत.
• घराभोवतालचे निरुपयोगी टायर, भंगार साहित्य, फुटक्या वस्तूंची तातडीने विल्हेवाट लावावी.
• इमारतीच्या छतावर आणि परिसरात कुठेही पाणी साचू देऊ नये.
• पक्षी आणि गुरांच्या पाण्याचे भांडे नियमित स्वच्छ करावेत .
• घरातील कुलर आणि फ्रिजचा ड्रीप पॅन नियमित स्वच्छ ठेवावा .
• सांडपाण्यासाठी शोषखड्डे तयार करावेत, गटारे वाहती ठेवावीत आणि साठलेल्या पाण्यावर निरुपयोगी ऑइल किंवा रॉकेल टाकावे.
• झोपताना कीटकनाशक भारित मच्छरदाणी व डास प्रतिबंधक साधनांचा वापर करावा तसेच अंगावर पूर्ण कपडे घालावेत.
• तलाव, ओढे व मोठ्या हौदांमध्ये डासांच्या अळ्या खाणारे ‘गप्पी मासे’ सोडावेत. हे मासे सर्व सरकारी आरोग्य केंद्रांवर मोफत उपलब्ध आहेत.
खाजगी डॉक्टरांना आणि प्रयोगशाळांना कडक निर्देश:
डेंग्यू हा ‘नोटिफायबल’ (अधिसुचित) आजार घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील खाजगी वैद्यकीय व्यावसायिक आणि खाजगी प्रयोगशाळांमध्ये डेंग्यूचा रुग्ण आढळल्यास, त्यांनी त्याची माहिती त्वरित जिल्हा आरोग्य कार्यालयाला देणे बंधनकारक आहे. डेंग्यूच्या निश्चित निदानासाठी केवळ ‘इलायझा टेस्ट’ (ELISA Test) शासनमान्य असून, त्यासाठी नंदुरबार शासकीय जिल्हा रुग्णालयात ‘सेन्टीनल सेंटर’ कार्यरत आहे. खाजगी डॉक्टरांनी रॅपिड टेस्टद्वारे संशयित आढळलेल्या रुग्णांचे रक्तजल नमुने (Serum Samples) अंतिम निदानासाठी या सेन्टीनल सेंटरकडे पाठवावेत, असे निर्देश डॉ. सोनवणे यांनी दिले आहेत.
डेंग्यूची लक्षणे आढळल्यास स्वतःच्या मनाने औषधोपचार न करता, तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घ्यावेत. नागरिकांनी नजीकच्या जिल्हा सामान्य रुग्णालय किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात (PHC) जाऊन रक्ताची मोफत तपासणी व औषधोपचार करून घ्यावा, असेही आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्री. सोनवणे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.















