Home महाराष्ट्र राष्ट्रकुल संसदीय परिषद लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी दिशादर्शक ठरेल – विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे

राष्ट्रकुल संसदीय परिषद लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी दिशादर्शक ठरेल – विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे

0
Commonwealth Parliamentary Conference will be a guide for the empowerment of democracy – Legislative Council Chairman Prof. Ram Shinde

नवी दिल्ली: राष्ट्रकुल राष्ट्रातील सभापती आणि पिठासीन अधिकारी यांच्या परिषदेच्या माध्यमातून भारतीय लोकशाहीचा वारसा जागतिक स्तरावर अधिक उजळून निघेल. तसेच  ही परिषद लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी  व्यक्त केला.

नवी  दिल्ली येथे 14 ते 16 जानेवारी 2026 दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रकुल राष्ट्रातील संसदीय सभापती आणि पिठासीन अधिकाऱ्यांच्या परिषदेसाठी (CSPOC) महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे उपस्थित होते.  परिषदेच्या आज दुसऱ्या दिवशी  त्यांनी ‘महाराष्ट्र सदन’ येथे माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला आणि या जागतिक परिषदेचे महत्त्व आणि त्यातील चर्चेच्या मुद्द्यांची सविस्तर माहिती दिली.

या परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले असून, यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह राष्ट्रकुलातील 42 देशांच्या  संसदेचे सभापती, उपसभापती आणि भारतातील सर्व राज्यांचे पीठासीन अधिकारी उपस्थित आहेत. या महत्वपूर्ण आयोजनाचा  संदर्भ देत प्रा. राम शिंदे म्हणाले की, भारतासाठी या परिषदेचे यजमानपद भूषवण्याची ही चौथी वेळ असून, लोकशाहीच्या जननीसाठी हा अत्यंत अभिमानास्पद क्षण आहे.

प्रा. शिंदे यांनी पंतप्रधानांच्या भाषणातील महत्त्वाच्या पैलूंचा उल्लेख केला. ते म्हणाले, पंतप्रधानांनी संविधानाच्या माध्यमातून भारतीय लोकशाही कशा पद्धतीने सुदृढ झाली आहे, याचे प्रभावी दर्शन जागतिक व्यासपीठावर घडवले. विशेषतः बदलत्या काळाची गरज ओळखून संसदीय कामकाजात ‘एआय’ (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबत त्यांनी केलेले सुतोवाच अत्यंत महत्त्वाचे आहे. संसदीय कार्यप्रणाली अधिक पारदर्शक आणि वेगवान करण्यासाठी तंत्रज्ञानाची ही जोड देशाला प्रगतीकडे नेणारी ठरेल.

ज्या ज्या देशांमध्ये लोकशाही आणि संसदीय व्यवस्था अस्तित्वात आहे, त्या सर्व देशांतील लोकशाही मूल्यांची जोपासना करणे हे या परिषदेचे मुख्य उद्दिष्ट आहे. प्रत्येक देशाला भेडसावणाऱ्या अंतर्गत समस्या, त्यावरील लोकशाही मार्गाने काढलेले तोडगे आणि विविध देशांच्या कार्यप्रणालीतील उत्तम उपक्रम यावर या परिषदेत सखोल मंथन होणार आहे. आपल्या संसदीय प्रणालीतील त्रुटी दूर करून ती अधिक लोकाभिमुख कशी करता येईल, यावर सर्व प्रतिनिधी चर्चा करणार आहेत,असेही त्यांनी यावेळी सांगितले.