छत्रपती संभाजीनगर : सिडको वाळूज महानगर परिसर छत्रपती संभाजीनगर महानगर विकास प्राधिकरणाकडे हस्तांतरित झाला असून, या परिसरातील वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर पायाभूत सुविधा तातडीने विकसित करणे आवश्यक आहे. यासाठी विकास आराखड्यासह निधी मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत नगर विकास विभागाकडे त्वरीत सादर करावा, असे निर्देश नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता यांनी दिले.
सिडको वाळूज महानगर परिसराच्या विकासासंदर्भात मुंबई येथे असीमकुमार गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस छत्रपती संभाजीनगर येथून विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, महानगर विकास प्राधिकरणाचे महानगर नियोजनकार हर्षल बाविस्कर, सहआयुक्त तसेच संबंधित अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
यावेळी गुप्ता यांनी वाळूज महानगर परिसराचा नकाशाव्दारे आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, वडगाव कोल्हाटी, वाळूज आणि बजाजनगर या भागांमध्ये वाढत्या लोकसंख्येला रस्ते, पाणीपुरवठा आणि इतर आवश्यक पायाभूत सुविधा सुनियोजित पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी प्राधिकरणाने सविस्तर विकास आराखडा तयार करावा. या आराखड्यासोबत आवश्यक निधीचा प्रस्ताव तातडीने सादर करावा, असेही त्यांनी निर्देश दिले. तसेच या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी विभागीय आयुक्तांनी सातत्याने पाठपुरावा करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी वाळूज परिसरातील मोठ्या प्रमाणावर साचणाऱ्या कचऱ्याच्या व्यवस्थापनाकडेही लक्ष वेधले. पायाभूत सुविधांच्या विकासासोबतच कचरा व्यवस्थापनाचे योग्य नियोजन करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
















