नंदुरबार जिल्ह्याने पुन्हा एकदा आपली कार्यक्षमता सिद्ध करत राज्यपातळीवर मोठा सन्मान पटकावला आहे. नागपूर येथील आयआयएममध्ये नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय संपूर्णता सन्मान समारंभात नंदुरबार जिल्हा आणि अक्राणी तालुक्याला त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आले.या समारंभात आकांक्षित जिल्ह्यांपैकी (Aspirational Districts) सातत्याने सुधारणा साधणाऱ्या जिल्ह्यांना गौरवण्यात आले.
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान:
मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या मार्गदर्शनाखाली निती आयोगाच्या संपूर्णता अभियानात नंदुरबार जिल्ह्याने ३ प्रमुख निर्देशांकांवर ‘संपृक्तता’ (saturation) गाठली, तर अक्राणी तालुक्याने ४ निर्देशांकांवर परिणामकारक कामगिरी केली. या यशस्वी प्रयत्नांबद्दल मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना कॉपर व ब्रॉन्झ पदक प्रदान करून सन्मानित केले.

समन्वय, सहभाग आणि सेवा – संपूर्णता यशाची त्रिसूत्री:
नंदुरबार जिल्ह्याने आरोग्य, पोषण, शेती, पायाभूत सुविधा आणि सामाजिक विकास या क्षेत्रांतील निर्देशांकांवर विशेष भर दिला. या यशामागे जिल्हा प्रशासनाने केलेले नियोजनबद्ध काम, विभागीय समन्वय, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, कृषी विभाग, महिला बचत गट यांचा सक्रिय सहभाग आणि जनतेच्या सहभागातून मिळालेले समर्थन हे घटक महत्त्वाचे ठरले.
‘आरोग्य धमनी’ – नंदुरबार जिल्ह्याचा आदिवासी आरोग्य सशक्तीकरण मॉडेल देशपातळीवर:
या राज्यस्तरीय सन्मानासोबतच, नंदुरबार जिल्ह्याच्या ‘Aarogya Dhamni’ या एकात्मिक आदिवासी आरोग्य मॉडेलची निवड निती आयोगाच्या देशपातळीवरील सर्वोत्तम उपक्रमांमध्ये (Best Practices) झाली आहे.
ही सादरीकरण बैठक ७ ऑगस्ट रोजी दिल्ली येथे पार पडणार आहे, जिथे नंदुरबारच्या कार्यपद्धतीला ओडिशा आणि मेघालयच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत सादर करण्याची संधी मिळणार आहे.
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे मनोगत:
‘नंदुरबार जिल्ह्याच्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन! विशेषतः अक्राणी तालुक्याच्या टीमला ‘Aspirational Block’ या श्रेणीत पदक मिळाल्यामुळे अतिशय आनंद झाला आहे. यासोबतच, आणखी एक गौरवाची बाब म्हणजे आपल्या जिल्ह्याच्या ‘आरोग्य धमनी’ या एकात्मिक आदिवासी आरोग्य मॉडेलची निवड नीती आयोगाकडून देशातील सर्वोत्तम उपक्रमांपैकी एक म्हणून करण्यात आली आहे. हे यश तुमच्यामुळे शक्य झाले आहे – तुमच्या निष्ठा, मेहनती आणि लोकसेवेतील समर्पणामुळे. पुढीलही कामगिरीत आपण असेच एकत्र येऊन नंदुरबार जिल्ह्याला संधींचा, विकासाचा आणि सन्मानाचा आदर्श ठरवूया.’
कार्यक्रमाला महसूलमंत्री चंद्रकांत बावनकुळे, मुख्य सचिव राजेश कुमार, अपर मुख्य सचिव राज गोपाल देवरा, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी यांच्यासह राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, आणि विविध जिल्ह्यांचे मान्यवर उपस्थित होते.
#nandurbarpride#SampurnataPuraskar2025#AarogyaDhamni#BestPracticesNiTi#TribalHealthModel#drmittalisethi#nandurbarawareness