Home महाराष्ट्र नोकरीमध्ये शिस्तबद्ध सर्जनशीलता महत्वाची

नोकरीमध्ये शिस्तबद्ध सर्जनशीलता महत्वाची

0
Disciplined creativity is important in the workplace

नवी दिल्ली: प्रशासकीय सेवेतील कठोर शिस्त आणि साहित्यातील सृजनशीलता यांचा सुवर्णमध्य साधत आपली प्रशासकीय सेवा केली असल्याचे मत आज महिला अधिकाऱ्यांनी आपले अनुभव ‘परिसंवादा’च्या माध्यमातून मांडले. निमित्त होते नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे आयोजित ‘प्रशासकीय महिला अधिकाऱ्यांच्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २०२६’ चे.

सरहद (पुणे) आयोजित आणि महाराष्ट्र सदन ,नवी दिल्ली व मराठी भाषा विभाग,महाराष्ट्र शासन यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनातील पहिल्या सत्रात ‘अडथळ्यांपलीकडचे कर्तृत्व: शासकीय सेवेतील महिला कर्तृत्वाची वाटचाल’ या विषयावर रंगलेल्या परिसंवादाने उपस्थितांची मने जिंकली.

भारतीय नागरी लेखा सेवेतील (ICAS) वरिष्ठ अधिकारी सुप्रिया देवस्थळी यांनी प्रशासकीय कसरत आणि ‘प्राधान्यक्रम’ यावर भाष्य केले. “घर आणि कार्यालयाचा समतोल राखणे हे केवळ महिलांचेच कर्तव्य आहे, हा सामाजिक दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे, असे त्या म्हणाल्या. महिलांनी ‘अपराधीपणाची भावना’ (Guilt) बाजूला सारून मुलांच्या संगोपनात त्यांना आपल्या कामाच्या ‘इकोसिस्टम’ची ओळख करून द्यावी, जेणेकरून ते अधिक सक्षम होतील, असेही त्यांनी नमूद केले.

भारतीय विदेश सेवेतील अधिकारी वल्लारी गायकवाड यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभवांचे पदर उलगडले. मेक्सिको आणि स्पेनमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना आलेले अनुभव सांगताना त्यांनी एआय आणि सायबर डिप्लोमसी यांसारख्या आधुनिक आव्हानांवर प्रकाश टाकला. मेक्सिकोतील भारतीय क्रांतिकारकांच्या ऐतिहासिक वारशाचा उल्लेख करत त्यांनी आपल्या कामात ‘व्हॅल्यू ॲड’ करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

नौदलातील साहसी प्रवासाचा उलगडा करताना, नागरी संरक्षण संचालनालयातील अधिकारी राजेश्वरी कोरी यांनी सुरक्षेच्या मुद्द्यावर भर दिला. युद्धनौकेवर नियुक्त होणाऱ्या उपखंडातील पहिल्या महिला अधिकारी म्हणून त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. संकट काळ कधीही लिंगभेद पाहत नाही, त्यामुळे महिलांनी स्वतःच्या सुरक्षेबाबत अधिक सजग राहणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

या महत्त्वपूर्ण परिसंवादाचे सूत्रसंचालन डॉ. सोनाली फुले आणि निवेदिता खांडेकर यांनी केले.