नंदुरबार जिल्ह्यातील युवकांना रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण मिळावे, या उद्देशाने माननीय जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी संत दगा महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), नंदुरबार येथे दुपारी प्रत्यक्ष भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी संस्थेतील विविध व्यवसाय प्रशिक्षण अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती घेतली तसेच प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी उपलब्ध संधी व मार्गदर्शनाबाबत चर्चा केली.
जिल्हाधिकाऱ्यांनी संस्थेमध्ये सुरू असलेल्या प्रशिक्षण अभ्यासक्रमांची पाहणी करत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कौशल्याधारित शिक्षणाच्या माध्यमातून युवकांनी आत्मनिर्भर व्हावे, उद्योग व स्वयंरोजगाराच्या दिशेने पुढाकार घ्यावा, असे मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले. प्रशिक्षण केवळ नोकरीपुरते मर्यादित न राहता उद्योजकता विकसित करण्यासाठी वापरले जावे, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला.
संस्थेच्या परिसराची पाहणी करताना त्यांनी स्वच्छता, आरोग्यविषयक बाबी तसेच पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत सुविधांबाबत आवश्यक सूचना दिल्या. विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरणात प्रशिक्षण मिळणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
या भेटीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी शॉर्ट टर्म कोर्स – सोलर टेक्निशियन, तसेच Information Technology, COPA, Fashion Technology आणि Dress Making विभागांना भेट देऊन तेथील प्रशिक्षण व्यवस्थेचा आढावा घेतला. सर्व विभागांतील कर्मचाऱ्यांचे त्यांनी त्यांच्या कार्याबद्दल विशेष कौतुक केले आणि गुणवत्तापूर्ण प्रशिक्षणाची ही परंपरा अधिक बळकट करण्याचे आवाहन केले.
ही भेट जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या दर्जात्मक सुधारणा, युवकांचे कौशल्यविकास व स्वावलंबनाला चालना देणारी ठरली आहे.

#Nandurbar#ITI#SkillDevelopment#VocationalTraining#SelfEmployment#YouthEmpowerment#DrMittaliSethi#SolarTechnician#MakeInIndia#AtmanirbharBharat
















