
एमव्हीआयआरडीसी वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबई, ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीज (एआयएआय) आणि सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग (सी-डॅक), मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एमएसएमईंसाठी सायबर सुरक्षा बळकट करणे’ या विषयावर ३१ जुलै रोजी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.
वाढत्या सायबर धोक्यांबाबत जागरूकता निर्माण करणे आणि उद्योगांना डिजिटल सुरक्षितता मजबूत करण्यासाठी व्यावहारिक उपाययोजना उपलब्ध करून देणे हा या चर्चासत्राचा उद्देश होता. चर्चासत्रात सहभागी मान्यवरांना संबोधताना डॉ. सी. पी. जॉन्सन म्हणाले, केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या सी-डॅकला संशोधन व विकास क्षेत्रात चार दशकांहून अधिक काळाचा वारसा आहे. उच्च कार्यक्षमता संगणन, कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा, डिजिटल गव्हर्नन्स, आरोग्यसेवा, क्वांटम कॉम्प्युटिंग आणि शिक्षण अशा धोरणात्मक तंत्रज्ञान क्षेत्रांत सी-डॅकचे योगदान आहे. भक्कम सायबर परिसंस्था उभारण्यासाठी सरकार, उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्र यांच्यातील सातत्यपूर्ण जागरूकता, सज्जता आणि सहकार्य आवश्यक आहे, असे डॉ. जॉन्सन यांनी नमूद केले.
या चर्चासत्रात उद्योजक, निर्यातदार, एमएसएमई, उद्योग व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सायबर सुरक्षेसमोरील आव्हाने, नियामक घडामोडी, सायबर हायजिन पद्धती आणि संस्थात्मक सायबर स्थैर्य बळकट करण्याच्या व्यावहारिक उपाययोजनांबाबत तज्ज्ञांशी संवादात्मक चर्चा झाली. कार्यक्रमाचा समारोप प्रश्नोत्तर सत्राने झाला. यावेळी व्यावहारिक सायबर सुरक्षा आव्हाने आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सहभागींनी तज्ज्ञांशी चर्चा केली.















