
राज्य मराठी विकास संस्थेच्या कामकाजात सातत्य, पारदर्शकता आणि परिणामकारकता यावी यासाठी वर्षभरातील सर्व वैधानिक बैठकींचे वेळापत्रक आगाऊ निश्चित करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळाच्या बैठकीत दिले. यावेळी राज्य मराठी विकास संस्थेची सर्व वैधानिक अनुपालने पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी संस्थेचे अभिनंदन केले.
संस्थेचा गेल्या काही वर्षांचा प्रशासकीय व वैधानिक अनुशेष (बॅकलॉग) पूर्ण झाल्याने संस्थेची प्रशासकीय रचना अधिक सक्षम झाली आहे. आता मराठी भाषेचा प्रचार, प्रसार, संशोधन आणि संवर्धन यासाठी ठोस धोरणे राबविण्यावर भर देणे आवश्यक आहे. संस्थेच्या कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्नही सकारात्मक भूमिकेतून सोडविण्यात येतील.
बैठकीस मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत, मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. श्यामकांत देवरे, साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ.सदानंद मोरे, भाषा संचालक अरुण गीते तसेच राज्य मराठी विकास संस्थेचे अशासकीय सदस्य प्रत्यक्ष व दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.















