Home शैक्षणिक नगरपरिषद शाळेतील विद्यार्थ्यांना चांगल्या शैक्षणिक सुविधा देण्याचा प्रयत्न

नगरपरिषद शाळेतील विद्यार्थ्यांना चांगल्या शैक्षणिक सुविधा देण्याचा प्रयत्न

1
Efforts to provide good educational facilities to students of municipal council schools

वर्धा: नगर परिषद शाळांमध्ये सर्वसामान्य गरीब घरातील मुले शिक्षण घेतात. त्यामुळे शहरातील या शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना चांगले अध्यापन आणि शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी केले.

रामनगर येथील वर्धा नगरपरिषदेच्या कमला नेहरु हायस्कूल मध्ये उभारण्यात आलेल्या वातानुकूलित ई-वाचनालयाचे लोकार्पण पालकमंत्री डॉ.भोयर यांच्याहस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, मुख्याधिकारी विजय देशमुख, नगर परिषद सभापती प्रियंका खंगार, राखी पांडे, स्नेहा आखरे, शुभांगी कोलते, नगरसेवक वंदना भुते, विलास आगे, सतिश मिसाळ, मेघना मले, स्वाती गव्हाणे, उज्वला पेठे, शाळेच्या मुख्याध्यापिका मैथिली मुळे आदी उपस्थित होते.

शहरातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका तसेच वाचनाच्या चांगल्या सुविधा देण्यासाठी आपण आठ ठिकाणी वातानुकूलीत ई-वाचनालये उभे करतो आहे. त्यापैकी दोन याधीच सुरु झाले आहे. उर्वरीत वाचनालयांचे काम सुरु आहे. ते देखील लवकरच सुरु होतील. पुर्वी नगरपरिषदेची कमला नेहरू ही शाळा शहरातील नामांकित शाळा होती. इंग्रजी खाजगी शाळांमुळे अशा अनेक शाळा दुर्लक्षित झाल्या आहे. या शाळांना पुन्हा नावलौकिक मिळवून देण्याचा माझा प्रयत्न आहे.

वर्धा शहरात असलेल्या नगरपरिषद शाळांच्या आधुनिकीकरणासाठी नगरपरिषदेने आराखडा तयार करावा. यासाठी जिल्हा नियोजन समिती आणि राज्यस्तरावरून निधी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करू. वर्धा शहरातील विद्यार्थ्यांसह नागरिकांकरीता नगरपरिषदेला सोबत घेऊन काम करणार असल्याचे पालकमंत्री डॉ.भोयर पुढे बोलतांना म्हणाले.

यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना नगराध्यक्ष सुधीर पांगुळ म्हणाले, शहरातील नगरपरिषद शाळांची गुणवत्ता सुधारणे आवश्यक आहे. डॉ.पंकज भोयर हे जिल्ह्याचे पालक आहे. नगरपरिषदेचे पालकत्व देखील त्यांनी स्वीकारावे आणि शाळांचा दर्जा उंचाविण्यासाठी मदत करावे. लोककल्याणासाठी नगरपरिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन कामे करणार असल्याचे श्री.पांगुळ म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी विजय देशमुख यांनी केले. पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी शहरासाठी 8 ई-वाचनालये मंजूर केले. त्यापैकी 6 वाचनालयाचे बांधकाम पुर्ण झाले आहे. त्यातील दोन वाचनालये सुरु झाले. कमला नेहरू विद्यालयातील मोठे वाचनालय असून शहरात एक चांगले शैक्षणिक वातावरण यामुळे निर्माण होतील, असे सांगितले.

सुरुवातीस पालकमंत्री व मान्यवरांनी ई-वाचनालयाच्या नामफलकाचे अनावरण तसेच फित कापून वाचनालयाच्या कक्षाचे लोकार्पण केले. वाचनालयाची पाहणी देखील यावेळी त्यांनी केली. कार्यक्रमास शाळेतील विद्यार्थी, पालक व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.