Home महाराष्ट्र विधानसभेत दिवंगत नेत्यांना भावपूर्ण श्रद्धांजली; दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतीस्थानाचा विधानसभाध्यक्षांचा प्रस्ताव

विधानसभेत दिवंगत नेत्यांना भावपूर्ण श्रद्धांजली; दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतीस्थानाचा विधानसभाध्यक्षांचा प्रस्ताव

0
Emotional tributes to late leaders in the Legislative Assembly; Speaker proposes memorial for late Deputy Chief Minister Ajit Pawar

मुंबई: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन राज्यासाठी आणि देशासाठी देखील मोठे नुकसान झाले आहे. या शब्दात विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी सहवेदना व्यक्त केल्या. अजित पवार यांच्याबद्दल सभागृहातील सदस्यांच्या भावना विचारात घेता विधिमंडळ परिसरात अजित पवार यांचे स्मृतीस्थान असावे, असा मानस इच्छा व्यक्त करुन शासनासमोर याबाबतचा प्रस्ताव मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री सुरुपसिंग नाईक, माजी मंत्री डॉ.शालिनीताई पाटील, माजी राज्यमंत्री राज पुरोहित, माजी सदस्य गंगाधर पटने, नीळकंठ फालक, विश्वास नांदेकर रुपलेखा ढोरे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत शोकप्रस्ताव मांडला. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या व्यक्तिमत्त्वातील शिस्त, वेळेचे काटेकोर पालन, कामातील परिपूर्णतेची जाणीव आणि सहकाऱ्यांप्रती असलेली आपुलकी यांचा उल्लेख करताना विधानसभा अध्यक्ष ॲड.नार्वेकर यांनी त्यांच्याबद्दलच्या आठवणी जाग्या केल्या. जीएसटी कौन्सिलमध्ये महाराष्ट्राची बाजू ठामपणे मांडणारा सक्षम अर्थमंत्री म्हणूनही त्यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. पहाटेपासून कामाला लागून कामकाजाची वेगळी पद्धत दाखवणारा नेता, दिलेला शब्द पाळणारा राजकारणी अशी त्यांची ओळख असल्याचे त्यांनी सांगितले.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृती कायम राहाव्यात यासाठी विधिमंडळाच्या आवारात त्यांच्या नावाने स्मृतीस्थान उभारण्याचा मानस असल्याचे अध्यक्षांनी सांगितले. पुढील पिढ्यांना त्यांच्या कार्याची जाणीव राहावी, असे त्यांनी नमूद केले.

माजी मंत्री सुरूपसिंग नाईक यांनी आदिवासी समाजासाठी शिक्षण, सहकार आणि व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात केलेल्या कार्याचा विधानसभा अध्यक्षांनी गौरव केला. डॉ. शालिनीताई पाटील यांनी सहकार, शिक्षण आणि ग्रामीण आरोग्य क्षेत्रात उभारलेल्या संस्थांची माहिती त्यांनी दिली. माजी राज्यमंत्री राज पुरोहित यांच्या लढाऊ नेतृत्वाची आणि भाडेकरू-व्यापारी वर्गासाठी त्यांनी संघर्ष केल्याचे त्यांनी सांगितले. गंगाधर पटने, नीलकंठ चिंतामण फालक, विश्वास रामचंद्र नांदेकर आणि रुपलेखा ढोरे यांनी शिक्षण, सहकार, सामाजिक चळवळी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील केलेल्या योगदानाचा त्यांनी यावेळी उल्लेख केला.

यावेळी मंत्री छगन भुजबळ, ॲड.आशिष शेलार, हसन मुश्रीफ, गुलाबराव पाटील, अदिती तटकरे यांच्यासह सभागृहातील सदस्य भास्कर जाधव, विजय वडेट्टीवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, सुधीर मुनगंटीवार, सुनील प्रभू, नितीन राऊत, रोहित पवार, विश्वजित कदम, जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यानंतर सभागृहातील सर्व सदस्यांनी शोकप्रस्तावास संमती देऊन दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली अर्पण केली.