आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत, बदललेल्या आहारपद्धतीत आणि वाढत्या तणावामुळे कर्करोगासारख्या गंभीर आजारांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. त्यामुळे आजार झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा ‘प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर’ या तत्त्वानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. एचपीव्ही लसीकरण हा त्याच दिशेने टाकलेले स्तुत्य पाऊल असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
राज्यातील ९ ते १४ वर्षे वयोगटातील मुलींना एचपीव्ही लस देण्याची ही व्यापक मोहीम राबवली जात असून त्यामुळे गर्भाशय मुखाच्या कर्करोगावर प्रभावी प्रतिबंध घालता येईल. जागतिक स्तरावर कर्करोग हा गंभीर आरोग्यविषयक प्रश्न बनत असताना राज्य सरकार या संदर्भात सक्रिय पावले उचलत असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव निपुण विनायक, आरोग्य विभागाच्या आयुक्त डॉ. कांदबरी बलकवडे आणि इतर सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
















