
“महाराष्ट्रातील शेतकरी हे राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. शेतीवर अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबांमध्ये महिलांची भूमिका निर्णायक आहे. गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्याच्या राज्य शासनाच्या कटिबद्धतेचे प्रतीक असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
या योजनेच्या पहिल्या टप्प्यात नागपूर, अमरावती, यवतमाळ, वाशिम, परभणी, जळगाव, बीड, अकोला आणि नांदेड या नऊ जिल्ह्यांचा समावेश आहे. ५० हजार एकर क्षेत्रावर पाच हजारांहून अधिक महिला शेतकरी आणि १०० स्वयंसहायता गट या उपक्रमाचा लाभ घेणार आहेत. पुढील तीन वर्षांत हा उपक्रम ५०० हून अधिक स्वयंसहायता गटांपर्यंत विस्तारण्यात येणार आहे. तसेच कापसाबरोबरच मका व इतर पिक उत्पादक शेतकऱ्यांपर्यंतही हा उपक्रम पोहोचवण्याचा मानस आहे.















