Home महाराष्ट्र बीडच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध – सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

बीडच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध – सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

1
Government committed to the overall development of Beed – Cooperation Minister Babasaheb Patil

बीड:  शासन बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी पूर्ण प्रयत्न करत आहे या पुढील काळात विकासाची ही गंगा वाहती रहावी यासाठी भगीरथ प्रयत्न सुरू आहेत. त्याला नागरिकांनी देखील साथ द्यावी, असे प्रतिपादन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी आज येथे केले. त्यांच्या हस्ते 77 वा प्रजासत्ताक दिनी मुख्य शासकीय ध्वजवंदन सोहळा पार पडला.

पोलीस कवायत मैदानावर झालेल्या या दिमाखदार सोहळ्यात नागरिकांचा सहभाग हे वैशिष्ट्य ठरले. याप्रसंगी आमदार विजयसिंह पंडित, आमदार संदीप क्षीरसागर, नगराध्यक्षा प्रमिला पारवे, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलीस अधीक्षक नवनित काँवत, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जतिन रहमान आदींची प्रमुख उपस्थिती यावेळी होती.

दिमाखदार संचलन तसेच 5000 शालेय विद्यार्थ्यांच्या समुहाने केलेल्या कवायती, लेझीम, प्रात्यक्षिके पोलीस दलाच्या श्वान पथकाने केलेली प्रात्यक्षिके आदींनी हा सोहळा रंगत गेला.

यावेळी बोलताना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सर्वप्रथम बीडवासीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
ते यावेळी म्हणाले की, स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आपण संविधान स्वीकृत केले. त्या संविधानावर आजवर देश विकासाची वाट चालत आहे. या संविधानाने दिलेली ही सार्वभौम प्रजासत्ताकाची संकल्पना पुढे नेताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आपला देश आता जागतिक स्तरावर चौथी मोठी अर्थसत्ता होत आहे.

राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वात राज्याला 1 ट्रिलियन अर्थव्यवस्था करण्याचे काम जोमाने सुरू आहे. या पुढाकारासाठी मी सर्वांचे आभार या प्रसंगी व्यक्त करतो, असे ते म्हणाले.

भौगोलिकदृष्ट्या राज्याच्या केंद्रस्थानी असणारा आपला हा बीड जिल्हा आगामी काळात विकासाचेही मोठे केंद्र ठरावे यासाठी शासन प्रयत्त करित आहे. पालकमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनात जिल्हा वाटचाल करीत आहे. बीडकरांचे रेल्वेचे स्वप्न आता पूर्णत्वास आले आहे आणि ही रेल्वे परळी वैजनाथ पर्यंत नेण्याचे काम गतिमान पद्धतीने सुरू आहे असे सांगून ते म्हणाले की अजित पवार यांच्या नियोजनातून येथे विमानतळ उभारणीच्या कामाला देखील गती देण्यात आली आहे. मनुष्यबळ विकासासाठी आणि शेतीवर अवलंबून असलेल्या या जिल्ह्यात शेती विकासाकरिता शासनाने प्राधान्य दिले आहे.

जिल्ह्याच्या विकासासाठी यंदाच्या आर्थिक वर्षात 575 कोटींचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे आणि त्यापैकी 539 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता देखील देण्यात आली आहे. अशी माहिती त्यांनी आपल्या भाषणात दिली.

जमिनीवर दिसणारा आणि साकारणारा विकास जिल्ह्यात विस्तारत आहे. जिल्हाधिकारी कार्यालय इमारत, प्रशासकीय इमारत तसेच कृषी भवन आदी इमारतींच्या कामातून याची प्रचिती येते. सहकार खात्याचा मंत्री या नात्याने सर्व सहकार विषयक कार्यालये एकाच इमारतीत असावी या भूमिकेतून शहरात मध्यवर्ती भागात 14 कोटी 98 लक्ष रुपये किमतीच्या मान्यतेसह चार मजली अद्ययावत इमारतीचे भूमीपूजन नववर्षदिनी करण्यात आले आहे. असेही त्यांनी आपल्या भाषणात नमुद केले.

ते पुढे म्हणाले की, शेतकरी हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. या भूमिकेतून जिल्ह्यात 10 कृषि उत्पन्न बाजार समिती कार्यरत आहेत. नोंदणीकृत सहकारी संस्थांची संख्या 3 हजारांहून अधिक आहे आणि या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सहकार विभागाच्या माध्यमातून पीक कर्ज वाटपात प्राधान्य दिले जात आहे. एकूण पीक कर्ज वाटपापैकी 75 टक्के वाटप माझ्या सहकार विभागाने केले हे सांगतांना मला कामाचे समाधान वाटते हे अभिमानाने मी या प्रसंगी नमूद करतो. चालू वर्षात जिल्ह्यात मोठ‌्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. यंदाच्या खरिप हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान झाले हे लक्षात घेऊन शासनाने जिल्ह्यातील 10 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती मदत म्हणून 750 कोटी 40 हजार इतकी विशेष अनुदान रक्कम मंजूर केले. आणि यापैकी 9 लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट 624 कोटी 55 लक्ष रुपये रक्कम जमा झाली आहे.

तसेच अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या 887974 इतक्या शेतकरी यांना रब्बी हंगामाचे पेरणी करिता रु. 708.08 (सातशे आठ कोटी आठ लक्ष रु.) इतके अनुदान मंजूर झाले असून त्यापैकी 807781 इतक्या शेतकरी यांच्या बँक खात्यात रु. 631.91 (सहाशे एकतीस कोटी एक्याण्णव लाख रु) वर्ग करण्यात आले आहेत. उर्वरित शेतकरी यांचे अनुदान वाटपाची कार्यवाही डीबीटी प्रणालीद्वारे सुरु आहे. या कामासाठी जिल्हाधिकारी श्री. विवेक जॉन्सन आणि त्यांच्या सर्व महसूल प्रशासनाचे अभिनंदन त्यांनी केले.

महसूल प्रशासनाने जिल्ह्यात ग्रामस्तरावर कामे गतिमान करण्यासाठी 2009-2010 नंतर प्रथमच 1179 (अकराशे एकोण ऐंशी) पोलीस पाटील पदे भरण्याची जम्बो भरती मोहिम हाती घेतली आहे. यासाठी 30 जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आहेत. या पदभरतीसाठी घेतलेल्या पुढाकाराबाबत विशेष अभिनंदन करावे लागेल असेही पाटील म्हणाले.

जिल्ह्याचा सर्वांगिण विकास करताना जिल्ह्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. याच भूमिकेतून जिल्हा विकास निधीमधून पोलीस दलास बळकटीकरण करण्यासाठी 11 कोटी 33 लाख 39 हजार इतका विशेष निधी देण्यात आला आहे. या निधीचा वापर करताना पोलीस दलाने नाविन्यपूर्ण संकल्पनादेखील राबविल्या आहेत. तक्रार निवारण दिवस, ई-साक्ष, भरोसा सेल, सायबर डेस्क तसेच संवाद प्रकल्प आदींच्या माध्यमातून तंटे आणि गुन्हे यांचे प्रमाण कमी करण्यात पोलीस दलाला यश आले आणि यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत आणि सर्व पोलीस दलाचे अभिनंदन याप्रसंगी मी करतो असे श्री. पाटील म्हणाले.

ग्रामीण विकास आणि जिल्हा परिषद यांचे अतूट असे नाते आहे. जिल्हा परिषदेने या वर्षी दिवाळी स्वत:च्या घरात अंतर्गत आवास योजनेत विक्रमी वाढ नोंदवत राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला. तसेच नववर्षदिनी एकाच वेळी 1300 हून अधिक विकास कामांचा शुभारंभ केला याचा मी देखील साक्षीदार आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आगामी काळातही याच पद्ध्तीने विकासकामे होतील याची मला खात्री आहे. असे सांगून सहकार मंत्री यांनी या विकासात शासनाने साद दिली आहे. प्रत्येक नागरिकाने याला प्रतिसाद द्यावा जेणेकरून आपण विकास गंगेचे भगीरथ कार्य पुढे नेऊ असे आवाहन त्यांनी सर्वांना केले.