
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आशा गटप्रवर्तकांच्या विविध मागण्या आणि प्रश्नांबाबत बैठक घेतली. याबाबत शासन सकारात्मक असून, त्यांच्या मागण्यांचा विचार करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. राज्यातील सुमारे ३२०० गटप्रवर्तकांच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी स्वतंत्र बैठक आयोजित करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना आणि आरोग्यविषयक उपक्रम तळागाळापर्यंत पोहोचविण्यात आशा गटप्रवर्तकांची भूमिका महत्त्वाची आहे. नागरिकांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देताना त्या आरोग्य विभाग आणि जनतेमधील महत्त्वाचा दुवा म्हणून काम करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या मागण्यांबाबत शासन संवेदनशील असून, सकारात्मक निर्णय घेण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही केली जाईल – मंत्री आबिटकर
बैठकीस आमदार मनीषा कायंदे, आमदार भावना गवळी, गटप्रवर्तक तसेच संघटनेचे प्रतिनिधी प्रवीण चौधरी आणि नेत्रदीपा पाटील उपस्थित होते.















