वर्धा: हातमाग विणकरांना नियमित रोजगार उपलब्ध करुन देणे तसेच परंपरागत हातमाग व्यवसायाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ सुरु करण्यात आले आहे. महामंडळामार्फत तयार करण्यात येणाऱ्या कापड साहित्याची जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालये, दवाखाने व वसतीगृहासाठी व विविध कार्यालयांनी खरेदी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
शासकीय व निमशासकीय कार्यालय, दवाखाने, वसतीगृह इत्यादी ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतात. सत्कारमुर्ती तसेच मान्यवर पाहुण्यांना भेटवस्तु देण्यासाठी हातमाग महामंडळाकडे कापडी गुलदस्ते, करवती व पैठणी स्टोल, दुपट्टे, हिमरु शॉल, पैठणी साडी व पर्स उपलब्ध आहेत. कापडी गुलदस्त्यांमध्ये वापरण्यात आलेल्या कापड वस्तुंचा उपयोग दैनंदिन जीवनशैलीमध्ये करता येतो. सदर साहित्य महामंडळामडून खरेदी करावे जेणे करुन हातमाग पारंपारिक व्यवसायाला प्रोत्साहन मिळेल.
राज्य शासनाच्या दि.18 एप्रिल 2018 च्या परिपत्रकानुसार महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ मर्यादित नागपूर यांना विदर्भ, मराठवाडा विभाग तसेच धुळे, नंदूरबार, जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र शासकीय पुरवठा करण्यासाठी ठरवून देण्यात आलेले आहे. तसेच हातमाग उद्योग टिकवून ठेवण्यासाठी केंद्र शासनाच्या वस्त्र मंत्रालयाच्या दि.3 सप्टेंबर 2008 च्या आदेशानुसार 11 प्रकारचे साहित्य आरक्षित ठेवलेले आहेत. यामध्ये बेडशिट, चादर, दरी, टॉवेल, कम्बल, ड्रेसमटेरियलचा समावेश आहे. सदर साहित्याचे उत्पादन हातमाग महामंडळ करीत आहे.
















