
राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास आणि औकाफ मंत्री तसेच नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ॲड. माणिकराव कोकाटे यांनी आज अतिवृष्टीग्रस्त चौपाळे पंचक्रोशीतील भागांचा दौरा करून प्रत्यक्ष स्थितीचा आढावा घेतला.
शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि “शासनाचा उद्देश दिवाळीपूर्वी सर्व पात्र शेतकऱ्यांना मदत पोहोचविण्याचा आहे” असे स्पष्ट केले.
गेल्या काही दिवसांत नंदुरबार तालुक्यात ६५ मिमीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने जिल्हा अतिवृष्टीग्रस्त घोषित करण्यात आला आहे. या पावसामुळे सुमारे २००० हेक्टर क्षेत्रातील पपई, केळी, कापूस आणि इतर पिकांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने तातडीने पंचनामे सुरू केले असून, अहवाल शासनाकडे पाठविण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे.
पालकमंत्री मा.ॲड. कोकाटे म्हणाले,
“शेतकऱ्यांना मदत मिळवून देणे ही आपली पहिली जबाबदारी आहे. विमा कंपन्यांचा कोणताही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही. ज्या शेतकऱ्यांनी पिकविमा उतरवला आहे, त्यांना शासनाकडून पूर्ण मदत मिळेल.”
ते पुढे म्हणाले की,
“अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक संकटांसमोर टिकाव धरणारे कृषी धोरण राबवले पाहिजे. केळी आणि पपईसारख्या पिकांच्या नुकसानातून शिकून नवे निर्णय घेण्याची वेळ आली आहे. यासाठी शासन पातळीवर पुढाकार घेण्यात येणार आहे.”
या पाहणी दौऱ्यात मा.आमदार राजेश पाडवी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सी.के. ठाकरे, महसूल आणि कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. प्रशासनाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित दिलासा मिळावा यासाठी समन्वयात्मक कार्यवाही सुरू आहे.
#Nandurbar#MaharashtraAdministration#ManikraoKokate#DrMitaliSethi#FarmerRelief#HeavyRain2025#AtivrushtiNandurbar#GovernmentForFarmers#MahaGovt#NandurbarUpdates#SmartAdministration#DistrictCollectorNandurbar#TeamNandurbar