नंदुरबार तालुक्यातील वाघाळे येथे जिल्हा रुग्णालय नंदुरबार आणि समाजकार्य महाविद्यालय (एम.एस.डब्ल्यू. कॉलेज), नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने एचआयव्ही/एड्स जनजागृती रॅली व मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात एचआयव्ही-एड्स जनजागृती रॅलीने करण्यात आली. या रॅलीचे उद्घाटन मा. आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मा. अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, तहसीलदार प्रदिपकुमार पवार, भाजप जिल्हाध्यक्ष निलेश माळी, तसेच सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.
रॅलीदरम्यान बॅनर, फलक आणि माहितीपर पोस्टरच्या माध्यमातून एचआयव्ही-एड्स व गुप्तरोगाबाबत जनजागृती करण्यात आली. गावातून काढण्यात आलेल्या या रॅलीमुळे नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाली.
यानंतर आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमात जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथील समुपदेशक तेजल माळी आणि सुभाष निकम यांनी एम.एस.डब्ल्यू. महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच ग्रामस्थांना एचआयव्ही-एड्स, गुप्तरोग, त्यांचे प्रतिबंधक उपाय आणि वेळेवर तपासणीचे महत्त्व याबाबत सविस्तर माहिती दिली.
या कार्यक्रमास एम.एस.डब्ल्यू. महाविद्यालयाचे प्राध्यापक, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समाजकार्य महाविद्यालयाचे आर.आर.सी. समन्वयक प्रा. चौरे यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच एस.एस.के. मॅनेजर गोपाल गाडीलोहार, एस.एस.के. ओ.आर.डब्ल्यू. प्रतिभा माळी आणि कुमारी नीलम पाडवी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
या उपक्रमामुळे वाघाळे परिसरात एचआयव्ही-एड्स प्रतिबंधाबाबत जनजागृती होण्यास मोठी मदत झाली.
Chandrakant Raghuvanshi @icbraghuvanshi
@mahahealthiec Maha Arogya IEC Bureau
#hivaids#CommunityAwareness#collectorofficenandurbar
















