Home महाराष्ट्र भारत महान प्रजासत्ताक राष्ट्र – पालकमंत्री मेघना बोर्डीकर

भारत महान प्रजासत्ताक राष्ट्र – पालकमंत्री मेघना बोर्डीकर

0
India is a great republic – Guardian Minister Meghna Bordikar

परभणी: आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वतंत्र देशाची राज्यघटना तयार करण्याचे महान कार्य घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. 26 जानेवारी 1950 रोजी भारत देश प्रजासत्ताक झाला आणि अंतिम सत्ता प्रजेच्या हाती सोपविण्यात आली. आपला भारत हा एक मोठा लोकशाही देश आहे. ज्या देशाची सर्व सत्ता प्रजेच्या हाती असते, तो देश म्हणजे प्रजासत्ताक होय. जगात भारत महान प्रजासत्ताक राष्ट्र आहे,  असे प्रतिपादन पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केले.

भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजवंदन श्रीमती बोर्डीकर यांच्या हस्ते आज परभणी येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडीयम येथे पार पडले. यावेळी शुभेच्छापर संदेश देताना त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर, मनपा आयुक्त नितीन नार्वेकर, प्रभारी अपर जिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, पदाधिकारी, पत्रकार, नागरिक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

पालकमंत्री  यांनी  आपल्या भाषणात भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी नमूद करत इंग्रजांच्या जोखडातून भारताला स्वातंत्र्य करण्यासाठी ज्या क्रांतीकारकांनी  बलीदान दिले, त्यांच्याबद्दल गौरवोद्गार व्यक्त करत प्रजासत्ताक भारताला जगात सामर्थ्यशाली बनविण्याचे आवाहन केले.

परभणी जिल्ह्याचे भूमिपूत्र श्रीरंग उर्फ दादा लाड यांना कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याच्या निमित्ताने पालकमंत्री यांनी  त्यांचे अभिनंदन केले. या पुरस्काराने परभणीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला, असे त्यांनी सांगितले.

पालकमंत्री म्हणाल्या की, इंग्रजांच्या सत्तेखाली भारताला दीर्घकाळ गुलामगिरी सहन करावी लागली. मात्र अनेकांचे त्याग, बलिदान आणि संघर्षानंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. दरम्यान, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही मराठवाडा निजाम संस्थानच्या राजवटीखाली होता. अनेक स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग व बलिदानातून 17 सप्टेंबर 1948 रोजी निजामाच्या जोखडातून हैदराबाद संस्थान भारतीय संघराज्यात विलिन झाले. पुढे राज्य पुनर्रचना झाल्यावर मराठवाडा महाराष्ट्रात सामील झाले. या स्वातंत्र्यलढ‌्यामध्ये परभणी जिल्ह्यातील अनेक स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले आहे. या सर्वांचे बलिदान व त्याग कायम स्मरणात ठेवून आपल्या संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचा अंगीकार करुन आपल्या देशाला अधिक सामर्थ्यशाली व बलशाली बनवूयात.

विद्यार्थ्यांची सामूहिक कवायत

प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध शाळांतील सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांनी  सामूहिक कवायत करुन उपस्थितांचा आनंद व्दिगुणित केला. विविध देशभक्तीपर गाण्यांवर अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने विद्यार्थ्यांनी कवायत सादर केली. या उपक्रमाला उपस्थितांनी भरभरुन प्रतिसाद दिला.

पोलीस विभागाच्या श्वान पथकाचे अनोखे सादरीकरण

पोलीस दलातील टायसन आणि सिंबा या श्वानांनी  विविध प्रात्यक्षिके सादर करुन उपस्थितांची भरभरुन दाद मिळवली. डॉग-बुलेट शो, अनोळखी इसमाकडून अन्न नाकारणे, शिस्तबध्दता, अडथळ्यांचे प्रात्यक्षिक असे विविध प्रात्यक्षिक टायसन आणि सिंबा यांनी करुन दाखवली. स्वत: पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे या श्वानांनी प्रात्यक्षिक सादर केली.

प्रारंभी पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी पोलिस, गृहरक्षक दल तसेच अन्य जवानांच्या पथ संचलनाचे निरिक्षण करुन संचलनाची मानवंदना स्वीकारली. यामध्ये पोलीस विभागाचे गृहरक्षक दल, विविध शाळांचे विद्यार्थी, जलद प्रतिसाद पथक, बॉम्ब शोधक वाहन, श्वान पथक, दंगा नियत्रंण पथक,  अग्निशमन दल, मतदान जनजागृती, कृषी, समाजकल्याण, उपप्रादेशिक विभाग यांचे चित्ररथ  यांचे संचलनात सहभागी झाले होते.

यावेळी पालकमंत्री यांनी स्वातंत्र्यसैनिक, उपस्थित नागरिकांची भेट  घेऊन त्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.  कार्यक्रमांचे सूत्रसंचालन सहशिक्षक प्रविण वायकोस यांनी केले.