(नंदुरबार) राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक वुईके यांच्या अध्यक्षतेखाली अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम, २००६ तसेच नियम २००८ व सुधारीत नियम २०१२ अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वैयक्तिक वनहक्क (I.F.R.) पट्टे वाटप मेळावा आयोजित करण्यात येत असल्याची माहिती नंदुरबार आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार यांनी कळविले आहे.
हा वनपट्टे वाटप कार्यक्रम रविवार, ०८ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ०३.०० वाजता, नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात पात्र आदिवासी व इतर पारंपारिक वननिवासी लाभार्थ्यांना त्यांच्या वैयक्तिक वनहक्कांचे अधिकृत पट्टे वितरित करण्यात येणार आहेत.
वनहक्क कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे आदिवासी बांधवांना त्यांच्या पारंपरिक उपजीविकेच्या साधनांवर कायदेशीर हक्क मिळावा, आर्थिक स्थैर्य निर्माण व्हावे आणि सामाजिक न्यायाची संकल्पना अधिक बळकट व्हावी, या उद्देशाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास पात्र लाभार्थ्यांनी, वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन नंदुरबार आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार यांच्यामार्फत करण्यात आले आहे.
















