Home महाराष्ट्र चारा टंचाईवर मात करण्यासाठी मासोद येथे काटेविरहित ‘कॅक्टस’ लागवडीचा अभिनव उपक्रम

चारा टंचाईवर मात करण्यासाठी मासोद येथे काटेविरहित ‘कॅक्टस’ लागवडीचा अभिनव उपक्रम

0
Innovative initiative to cultivate thornless 'cactus' in Masod to overcome fodder shortage

अमरावती: जिल्ह्यातील ग्रामपंचायत मासोद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोपवाटिकेमध्ये सामाजिक वनीकरण विभागामार्फत काटेविरहित ‘कॅक्टस’ (निवडुंग) या चारा उपयोगी प्रजातीच्या रोपांची लागवड करण्यात आली. राजमाता जिजाऊ मासाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून हा उपक्रम राबविण्यात आला. पशुधनासाठी जाणवणारी चारा टंचाई दूर करणे आणि पडिक जमिनीचा सुयोग्य वापर करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. याप्रसंगी विभागीय आयुक्त कार्यालयाचे अधीक्षक कृषी अधिकारी निलेश ठोंबरे, पशुवैद्यकीय अधिकारी, वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी भालचंद्र गावंडे, प्रवीण गुल्हाने व इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

कॅक्टस ही प्रजाती अत्यंत कमी पाण्यात, डोंगराळ भागात आणि निकृष्ट जमिनीत जिथे इतर फळझाडे येऊ शकत नाहीत, तिथेही जोमाने वाढते. तसेच ही लागवड भूजल पातळी वाढविण्यासही मदत करते. याप्रसंगी निलेश हेलोंडे पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, महाराष्ट्रात उन्हाळ्यात जाणवणारी चारा टंचाई दूर करण्यासाठी काटेविरहित कॅक्टस ही एक क्रांतिकारी वनस्पती ठरू शकते. ही केवळ लागवड नसून दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी एक वरदान आहे. ज्या जमिनीवर काहीही उगवत नाही, अशा पडीक जमिनीत कॅक्टस लावून जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवता येतो. कॅक्टसमध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असल्याने जनावरांची पाण्याची गरजही काही प्रमाणात भागते. या प्रजातीची लागवड प्रत्येक गावात करणे ही काळाची गरज असून, यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होईल.

यावेळी उपस्थित तज्ज्ञांनी कॅक्टसच्या चारा गुणधर्मांबाबत माहिती दिली. यामध्ये तंतूमय पदार्थ आणि पाण्याचे योग्य प्रमाण असल्याने जनावरांच्या आरोग्यासाठी ते अत्यंत उपयुक्त ठरते. चारा टंचाईच्या काळात हा एक स्वस्त आणि शाश्वत पर्याय आहे. विशेष म्हणजे, 3 किलो कॅक्टसपासून 3.38 स्क्वेअर फूट लेदर तयार होते, ज्याचा वापर जोडे, चप्पल आणि बॅग तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.