Home तळोदा तळोदा तालुक्यातील रांझणी येथे बिबट्याच्या हल्ल्यात जगदीश पाडवी जखमी

तळोदा तालुक्यातील रांझणी येथे बिबट्याच्या हल्ल्यात जगदीश पाडवी जखमी

197
leopard attack at Ranzani in Taloda taluka
leopard attack at Ranzani in Taloda taluka

(तळोदा ) तळोदा तालुक्यातील रांझणी येथे रात्रीच्या सुमारास एका इसमावर हल्ला चढवून बिबट्याने जखमी केल्याची घटना घडली. त्यामुळे परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने बिबट्याच्या तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. (Jagdish Padvi injured in leopard attack at Ranzani in Taloda taluka)

बिबट्या हल्ला : तरुण व ग्रामस्थांची घटनास्थळी धाव

तळोदा तालुक्यातील रांझणी येथे गोपाळपूर रस्ता लगत जगदीश हिरालाल पाडवी यांचे नाल्या शेजारी घर आहे. गुरुवार दि.१८ रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास जगदीश पाडवी घरात झोपले असताना अचानक घराच्या पाठीमागे त्यांना कोंबड्यांच्या फडफडण्याचा आवाज ऐकू आला. कोंबड्यांची फडफड ऐकून ते घराबाहेर पडले असता अचानक बिबट्याने त्यांच्यावरच हल्ला चढविण्याचा प्रयत्न केला. यावेळी जगदीश पाडवी यांनी प्रसंगावधान राखत स्वतःला वाचविण्यासाठी आपला डाव्या हाताच्या ठोशाने बिबट्याला बाजूला सारले.त्यांनी जोरात आरोळी ठोकल्याने घराशेजारी राहणारे रहिवासी धावून आल्याने बिबट्याने तेथुन पळ काढला.दरम्यान जगदीश पाडवी यांच्या हातावर बिबट्याने पंजाने ओरबडून जखमी केले होते. सदर वार्ता वाऱ्यासारखी गावात पसरल्यावर सागर गोसावी, प्रमोद सोनवणे, सोनू पाडवी, सुभाष पाडवी यांच्यासह तरुण व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.

बिबट्या हल्ला : वन विभागाची घटनास्थळी धाव

यावेळी जखमी अवस्थेतील जगदीश पाडवी यांना तात्काळ तळोदा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान पुन्हा काही वेळानंतर त्याच परिसरात नाल्या शेजारील शेतात डुकराचा ओरडण्याचा आवाज आल्याने पुन्हा नागरिक भयभीत झाले. कोंबड्यांची शिकार हातातून निसटल्याने बिबट्याने डुकरावर ताव मारला असावा असा अंदाज उपस्थितांकडून व्यक्त करण्यात येत होता. सदर घटनेचे वृत्त ग्रामस्थांकडून वन विभागाला कळविण्यात आल्यानंतर तात्काळ वनक्षेत्रपाल स्वप्नील भामरे यांच्यासह वनरक्षक गिरधन पावरा, नामदेव डोंगरे, जाल्या पाडवी, वनपाल वासुदेव माळी यांची टीम घटनास्थळी हजर झाली. यावेळी जगदीश पाडवी यांच्या घराशेजारी चिखलात त्यांना ठीक ठिकाणी बिबट्याच्या पंजाचे ठसे तसेच बिबट्याने दोन कोंबड्याच्या फडशा पाडल्याचे आढळून आले.  वनक्षेत्रपाल श्री.भामरे यांनी तात्काळ जगदीश पाडवी यांची रुग्णालयात भेट घेऊन विचारपूस केली.यावेळी श्री. भामरे यांनी रात्रीच्या वेळी नागरिकांनी आपल्या लहान मुलांना घराबाहेर पडू देऊ नये, तसेच स्वरक्षणार्थ कोणकोणते उपाययोजना कराव्यात याविषयी माहिती दिली.

leopard attack taloda

बिबट्या हल्ला : वन विभागाने परिसरात पिंजरे लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा

दरम्यान दोन दिवसांपूर्वीच दलेलपूर शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात एका दहा वर्ष वयाचा बालकाचा बळी गेल्याची घटना ताजी असताना, पुन्हा रांझणी येथे एका मोठ्या माणसावर हल्ला चढविल्याने लोकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने परिसरात पिंजरे लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.