
(नंदुरबार) जिल्ह्यातील ग्रामीण भागात पायाभूत सेवा अधिक सक्षम व्हाव्यात यासाठी राज्याचे कृषी मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या सभागृहात महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेण्यात आली. यामध्ये जलजीवन मिशन, सिंचन आणि वीज वितरणाशी संबंधित योजनांबाबत सविस्तर चर्चा झाली.
जलजीवन मिशन – दर्जेदार व वेळेत कामांचा आदेश
पालकमंत्री कोकाटे यांनी जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांमध्ये दर्जा आणि वेळेचे पालन अत्यंत महत्त्वाचे असून, पाण्याचा स्रोत नसलेल्या जागी योजना सुरू करण्याऐवजी स्रोत असलेल्या ठिकाणीच योजना कराव्यात असे स्पष्ट केले. धडगावसारख्या भागात विहिरींना पाणी नसल्यामुळे नर्मदा किंवा उकाई धरणातून पाणी घेण्याच्या पर्यायावर चर्चा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सौर ऊर्जा हा पर्याय
वीज नसल्यामुळे अपूर्ण राहिलेल्या पाणीपुरवठा योजनांना सौरऊर्जेच्या सहाय्याने कार्यान्वित करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. नवीन योजना सौर पर्यायासह तयार करण्यावर भर देण्यात आला.
पाण्याच्या गुणवत्तेवर भर
क्षारयुक्त पाण्याचे नमुने तपासून त्याठिकाणी फिल्टर प्लांट्स बसवण्याचे नियोजन करण्यात यावे असे निर्देश त्यांनी दिले.
विविध विभागांचा सखोल आढावा
बैठकीत स्वच्छ भारत अभियान, मनरेगा, कृषी, पशुसंवर्धन, शिक्षण, महिला व बालकल्याण, बांधकाम, लघुपाटबंधारे, समाजकल्याण व आरोग्य विभाग यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
दुर्गम भागातील अंगणवाड्यांमध्ये स्थानिक महिलांना मदतनीस म्हणून संधी द्यावी असे स्पष्ट आदेश पालकमंत्र्यांनी दिले.
वीज वितरणात तत्काळ उपाययोजना
मौसमी वादळांमुळे पडलेले वीज खांब व जळालेले ट्रान्सफॉर्मर तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच सोलर कनेक्शनची प्रतीक्षा करणाऱ्या लाभार्थ्यांना तात्काळ कनेक्शन देण्यात यावे, अशी सूचनाही दिली.
जिल्ह्यातील विद्युतीकरणासाठी ३९८ कोटींची मंजुरी असून, ५० कोटी रुपये आधीच प्राप्त झाले आहेत. अजूनही ३० गावांमध्ये आणि ४०० वाड्यांमध्ये वीज पोहोचवणे गरजेचे आहे. यासाठी पुरवणी अर्थसंकल्पात १०० कोटी रुपयांची तरतूद करण्याची विनंती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात येणार आहे.
लोकप्रतिनिधींचा सकारात्मक सहभाग
बैठकीत आमदार चंद्रकांत रघुवंशी, डॉ. विजयकुमार गावित, आमश्या पाडवी यांच्यासह जिल्हा परिषद सीईओ सावन कुमार, पोलिस अधीक्षक श्रवण दत्त आणि सर्व संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते.
ही बैठक जलजीवन, सिंचन व विद्युतीकरण या तीनही महत्त्वाच्या क्षेत्रांत एकत्रित प्रयत्नांनी जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरली आहे.
#Nandurbar#JalJeevanMission#ElectricityForAll#SustainableDevelopment#SolarPower#WaterForAll#EaseOfLiving#CollectorOfficeNandurbar