
भारत सरकारच्या कृषी मंत्रालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना’ चा शुभारंभ मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्तेनवी दिल्ली (पुसा) येथे संपन्न झाला. या ऐतिहासिक कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) आत्मा, नंदुरबारतर्फे जिल्हा मुख्यालयावर भव्य पद्धतीने आयोजित करण्यात आले.
या योजनेचा प्रमुख उद्देश शेती उत्पादनक्षमता वाढविणे, नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणे आणि शाश्वत कृषी व्यवस्थेचा विकास साधणे हा आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील कार्यक्रमाचे उद्घाटन मा. डॉ. विजय कुमार गावीत, आमदार, नंदुरबार यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात सांगितले की, ‘प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवेल. नैसर्गिक शेती, कडधान्य उत्पादन आणि माती आरोग्य व्यवस्थापन या माध्यमातून शेती अधिक लाभदायक बनविणे हे या योजनेचे वैशिष्ट्य आहे.’
या प्रसंगी कृषी विभाग, आत्मा नंदुरबार, तसेच कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ, कृषी अधिकारी, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी, नैसर्गिक शेती करणारे शेतकरी, पीक स्पर्धा विजेते शेतकरी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण https://pmindiawebcast.nic.in/ या लिंकद्वारे करण्यात आले. सर्व उपस्थितांनी मा. पंतप्रधान मोदी यांच्या मार्गदर्शक भाषणाचे थेट दर्शन घेतले. मा. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात ‘शेतकऱ्यांचा सन्मान आणि मातीचे रक्षण’ हेच भारतीय कृषी धोरणाचे केंद्र असल्याचे अधोरेखित केले. या निमित्ताने आत्मा नंदुरबारतर्फे जिल्ह्यातील सर्व तालुका मुख्यालये, ग्रामपंचायती, प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रे, कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि प्राथमिक सहकारी पतसंस्थांमध्येही हा कार्यक्रम थेट प्रक्षेपित करण्यात आला.
नंदुरबार जिल्ह्यातील कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना नवीन योजनांचे सविस्तर मार्गदर्शन केले. उपस्थित शेतकऱ्यांनी या उपक्रमाचे स्वागत करत आत्मनिर्भर शेतीच्या दिशेने प्रयत्नशील राहण्याचा संकल्प व्यक्त केला.
संपूर्ण जिल्ह्यातील कृषी समुदायाने ‘प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना’ ला दिलेला प्रतिसाद उत्साहवर्धक असून, नंदुरबार जिल्हा या योजनेच्या माध्यमातून नैसर्गिक, शाश्वत आणि समृद्ध शेतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

@drvijaykgavit
#प्रधानमंत्रीधनधान्ययोजना#आत्मानंदुरबार#PMKisanSamriddhi#Nandurbar