Home आरोग्य बौद्धिकदृष्ट्या अक्षम व मानसिक आजारी व्यक्तींसाठी कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम

बौद्धिकदृष्ट्या अक्षम व मानसिक आजारी व्यक्तींसाठी कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम

1
Legal awareness program for intellectually disabled and mentally ill persons

बौद्धिकदृष्ट्या अक्षम आणि मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्तींसाठी कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,उस्मानाबाद व नागनाथ निवासी मतिमंद विद्यालय, खाणापूर यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच नागनाथ निवासी मतिमंद विद्यालय, खाणापूर येथे करण्यात आले.हा कार्यक्रम जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती अभिश्री देव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षा तथा न्यायाधीश श्रीमती भाग्यश्री पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मानसिक आजार व बौद्धिक अक्षमता असलेल्या व्यक्तींसाठी शासनाच्या विविध योजना,त्यांचे हक्क व संरक्षण याबाबत सखोल मार्गदर्शन केले. दिव्यांग व्यक्तींनी कायदेशीर सल्ला व मार्गदर्शनासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क साधावा,असे आवाहन त्यांनी केले.यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचा मोफत टोल फ्री क्रमांक १५१००,तसेच बौद्धिकदृष्ट्या अक्षम व मानसिक विकलांग व्यक्तींसाठी मदत क्रमांक १४४४६ याबाबत उपस्थितांमध्ये जागृती करण्यात आली. तसेच बालकांसाठीच्या मदत वाणी (हेल्पलाईन) १०९८ विषयी माहिती देऊन दिव्यांग बालकांच्या प्रलंबित प्रश्नांची माहिती जाणून घेऊन ते प्रश्न संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून लवकरात लवकर मार्गी लावण्याची विनंती त्यांनी केली.

या कार्यक्रमास अखिल भारतीय अपंग कल्याणकारी प्रसारक मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत जाधव,नागनाथ निवासी मतिमंद विद्यालयाचे सचिव राजेंद्र जाधव, मुख्याध्यापिका जयश्री कदम, नवनाथ निवासी विद्यालयाचे प्राचार्य पांडुरंग जाधव,उपमुख्य न्यायरक्षक अभय पाथ्रूडकर,सहाय्यक न्यायरक्षक शुभम गाडे,पॅनल विधिज्ञ विश्वजीत शिंदे आदी मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
कायद्याची माहिती नसल्यामुळे अनेकजण आपल्या हक्कांपासून वंचित राहतात. त्यामुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सर्वसामान्य नागरिकांसाठी सदैव उपलब्ध असून मोफत विधिज्ञ व मोफत कायदेविषयक सल्ल्यासाठी नागरिकांनी संपर्क साधावा,असे मार्गदर्शन उपमुख्य न्यायरक्षक ॲड.अभय पाथरूडकर यांनी केले.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या दिव्यांगांसाठीच्या योजना,विविध उपक्रम तसेच बालकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती सहाय्यक न्यायरक्षक ॲड. शुभम गाडे यांनी आपल्या भाषणातून दिली.

अन्न हे शरीराचे पोषण करते आणि शिक्षण हे मनाचे पोषण करते.दोन्ही हक्क एकमेकांना पूरक असून भुकेले मूल शाळेत लक्ष केंद्रित करू शकत नाही आणि अशिक्षित व्यक्ती स्वतःसाठी पुरेसे अन्न मिळवू शकत नाही,असे महत्त्वपूर्ण विचार ॲड. विश्वजित शिंदे यांनी आपल्या भाषणात मांडले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक विनोद लांडगे यांनी केले,तर कार्यक्रमाच्या फलप्राप्तीचे महत्त्व सांगून शिक्षक सुधाकर कोळगे यांनी आभार मानले.या कार्यक्रमास विद्यालयातील शिक्षक,विद्यार्थी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.