Home नंदुरबार जिल्हा चला खेळूया… गुणवत्तेचा सामना – राजमोही लहान शाळेचा प्रेरणादायी शैक्षणिक प्रयोग जि....

चला खेळूया… गुणवत्तेचा सामना – राजमोही लहान शाळेचा प्रेरणादायी शैक्षणिक प्रयोग जि. प. मराठी शाळा

2
Let's play... Quality match - Rajmohi Small School's inspiring educational experiment Z. P. Marathi School

निपुण भारत अभियानाच्या उद्दिष्टांना प्रत्यक्ष कृतीत उतरवत अक्कलकुवा तालुक्यातील जि. प. मराठी शाळा, राजमोही लहान यांनी ‘चला खेळूया… गुणवत्तेचा सामना’ हा अभिनव व प्रेरणादायी उपक्रम यशस्वीपणे राबविला. 2026–27 अखेर विद्यार्थ्यांमध्ये मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान विकसित करण्याच्या उद्देशाने शाळेने सातत्यपूर्ण प्रयत्न करत इयत्ता 1 ते 5 मधील 96% विद्यार्थी अध्ययन निष्पत्ती साध्य करून निपुण भारताची सर्व उद्दिष्टे पूर्ण केली आहेत.

या उपक्रमाचा मुख्य हेतू म्हणजे डिजिटल व इंटरॲक्टिव्ह तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षणाची गुणवत्ता अधिक समृद्ध करणे. विद्यार्थ्यांना आधुनिक साधनांचा अनुभव मिळावा आणि शाळेत इंटरॲक्टिव्ह टीव्ही उपलब्ध व्हावा, यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःची गुणवत्ता सादर करण्याचा निर्धार केला.

उपक्रमाची उद्दिष्टे:

1. शिक्षणाची गुणवत्ता सुधारणे

2. विद्यार्थ्यांमध्ये आधुनिक साधनांबद्दल उत्सुकता निर्माण करणे

3. शाळेत सकारात्मक व स्पर्धात्मक वातावरण निर्माण करणे

4. नेतृत्वगुण, आत्मविश्वास व सृजनशीलतेला चालना देणे

5. अंमलबजावणी आणि प्रत्यक्ष सादरीकरण

नोव्हेंबर 2025 मधील वाण्याविहीर केंद्राची शिक्षण परिषद शाळेत आयोजित करण्यात आली. या परिषदेसाठी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, तसेच जिल्हा व तालुका स्तरावरील अधिकारी, शिक्षक, पालक व शालेय व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते.

या वेळी शाळेतील 100% विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला भव्य आगमनोत्सव सादर करण्यात आला. डंबेल्स, लेझीम, कवायत, रिंग प्रात्यक्षिक, परेड, धनुष्यबाण, सूत्रसंचालन अशा विविध कलागुणांचे दर्शन घडवत सुमारे 60 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला.

यानंतर ‘गुणवत्तेचा सामना’ या मुख्य उपक्रमात इयत्ता 1 ते 5 मधील 12 विद्यार्थ्यांच्या संघाने गणित विषयातील 100% अध्ययन निष्पत्तीवर आधारित प्रश्नांची थेट (Live Demo) अचूक सोडवणूक करून उपस्थितांची मने जिंकली. विविध मान्यवरांनी विचारलेले अवघड प्रश्न विद्यार्थ्यांनी टप्प्याटप्प्याने फळ्यावर सोडवले.

विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणाने प्रभावित होऊन मा. गटविकास अधिकारी श्री. विजय अहिरे यांनी शाळेस इंटरॲक्टिव्ह टीव्ही देण्याचे आश्वासन दिले. हा क्षण विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे खरे यश ठरला.

उपक्रमातून झालेले सकारात्मक बदल:

1. विद्यार्थी अधिक आत्मनिर्भर व सक्षम झाले

2. शाळेची प्रतिमा उंचावली

3. शिक्षकांचे मनोबल वाढले

4. सुपीक स्पर्धात्मक वातावरण निर्माण झाले

5. नेतृत्वगुण व आत्मविश्वासात वाढ झाली

या संपूर्ण उपक्रमाचे यशस्वी नेतृत्व मुख्याध्यापक श्री. प्रवीणकुमार देवरे व सहशिक्षक श्री. रमेश कोकणी यांनी केले. शिक्षक व विद्यार्थ्यांच्या संयुक्त प्रयत्नांतून ‘चला खेळूया… गुणवत्तेचा सामना’ हा उपक्रम निपुण भारताच्या दिशेने एक आदर्श मॉडेल ठरला आहे.

(Collector Office Nandurbar, Nandurbar Education)