Home नंदुरबार जिल्हा महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक

महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक

1
Maharashtra Medical Council Election

(नंदुरबार) महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (MMC) निवडणूक 2026 साठी येत्या 26 एप्रिल 2026 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नोंदणीकृत 591 वैद्यकीय व्यावसायिकांसाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली असून, बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मतदान केंद्र निश्चित करण्यात आले असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (प्रशासन) तथा नोडल अधिकारी महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक-2026 प्रमोद भामरे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

निवडणुकीचे स्वरूप व वेळ

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या एकूण 09 सदस्य पदांसाठी ही निवडणूक होत असून, त्यासाठी राज्यभरातून 60 उमेदवार रिंगणात आहेत. रविवारी सकाळी 08-00 वाजल्यापासून सायंकाळी 05-00 वाजेपर्यंत मतदारांना आपला हक्क बजावता येईल. मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याच दिवशी मतपेट्या मुंबई येथील हाफकीन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी संस्थेत जमा केल्या जाणार आहेत.

नंदुरबारमधील मतदान केंद्र

जिल्ह्यातील मतदारांसाठी ‘जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय’ येथील वैद्यकीय अधीक्षक कार्यालयातील खोली क्रमांक 04 मध्ये मतदान केंद्र तयार करण्यात आले आहे. ही प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा समन्वय अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी आणि मतदान केंद्राध्यक्षांची नेमणूक करण्यात आली असून त्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.

ओळखपत्रासाठी नियम

ज्या डॉक्टरांची नावे मतदार यादीत आहेत, त्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहून मतदान करावे लागेल. मतदानासाठी खालीलपैकी कोणतेही एक ओळखपत्र सोबत ठेवणे अनिवार्य आहे:

• महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने दिलेले मूळ नोंदणी प्रमाणपत्र.

• निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स.

• नोंदणी प्रमाणपत्रावर फोटो नसल्यास, फोटो असलेले इतर शासकीय ओळखपत्र दाखवणे आवश्यक असेल.

नंदुरबार जिल्ह्यातील सर्व 591 पात्र डॉक्टरांनी या निवडणुकीत 100 टक्के मतदान करून आपला लोकशाहीचा हक्क बजावावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.