पीएमएफएमई योजनेत महाराष्ट्र देशात अव्वल; ‘सर्वोत्तम कामगिरी करणारे राज्य’ पुरस्काराने गौरव
पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (पीएमएफएमई) अंतर्गत ‘सर्वोत्तम कामगिरी करणारे राज्य’ या राष्ट्रीय पुरस्काराने महाराष्ट्राला गौरविण्यात आले आहे. नवी दिल्लीतील इंडिया हॅबिटॅट सेंटर येथे केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांच्या हस्ते कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महाराष्ट्राच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला.
“हा पुरस्कार राज्यातील शेतकरी, महिला, युवा, स्वयं सहायता समूह, शेतकरी उत्पादक संस्था, सूक्ष्म उद्योजक आणि कृषी विभागाच्या अथक मेहनतीची पावती आहे. या सन्मानामुळे कृषीमालाचे अधिकाधिक मूल्यवर्धन करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला आणि ग्रामीण रोजगाराला बळ देण्याची जबाबदारी आणखी वाढली आहे,” असे मंत्री भरणे म्हणाले.
पीएमएफएमई अंतर्गत राज्यातील ३१ हजार ९५६ मंजूर प्रक्रिया प्रकल्पांपैकी १७ हजार ९४१ प्रकल्प महिला लाभार्थींचे असून, त्यांचे प्रमाण ५६ टक्के आहे. वैयक्तिक, समूह आणि सामायिक पायाभूत सुविधा अशा एकूण प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असून, त्यापैकी २५ हजार ७ वैयक्तिक, ३८८ समूह आणि २५ सामायिक पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी अनुदान वितरित करण्यात आले आहे. तसेच ४७ हजार ५४४ लाभार्थ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून, ही कामगिरी देशात सर्वाधिक आहे.
‘बीज भांडवल’ अंतर्गत ६१ हजार ३२३ स्वयं सहायता समूह सदस्यांना २२१.७७ कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. या प्रकल्पांमधून २.६४ लाख प्रत्यक्ष रोजगार आणि ७.९२ लाख मनुष्यदिवस अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती अपेक्षित असून, १७.७९ लाख मेट्रिक टन प्रक्रिया क्षमता निर्माण होत आहे. मंजूर प्रकल्पांची एकूण किंमत ३ हजार १५५ कोटी रुपये असून, ७१५ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.
देशातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या १० जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील ७ जिल्ह्यांचा समावेश असून, छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच ग्रामीण व शहरी उपजीविका अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीत महाराष्ट्राने देशातील मोठ्या राज्यांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावर गौरव मिळवला आहे.