Home नंदुरबार जिल्हा स्मार्ट मीटरसंदर्भातील शंकांचे महावितरणकडून निरसन संवाद मेळाव्यांना ग्राहकांचा प्रतिसाद प्रात्यक्षिकाद्वारे केले ग्राहकांचे...

स्मार्ट मीटरसंदर्भातील शंकांचे महावितरणकडून निरसन संवाद मेळाव्यांना ग्राहकांचा प्रतिसाद प्रात्यक्षिकाद्वारे केले ग्राहकांचे समाधान

0
Mahavitaran addresses queries regarding smart meters; consumers respond positively to interactive meets; customer concerns resolved through live demonstrations.

नंदुरबार : स्मार्ट मीटरबाबत वीज ग्राहकांच्या मनातील शंका, गैरसमज दूर करण्यासाठी आणि या मीटरची वास्तविकता व फायदे थेट सांगण्यासाठी महावितरणच्या जळगाव परिमंडळाने पुढाकार घेतला. मंगळवारी (21 जुलै) परिमंडलांर्तगत जळगाव, धुळे व नंदुरबार मंडलातील सर्व उपविभागीय कार्यालयांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या संवाद मेळाव्यांना जवळपास वीज ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यांत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ग्राहकांना स्मार्ट मीटरच्या उपयुक्ततेची माहिती दिली सोबतच थेट जागेवरच ‘चेक मीटर’ आणि प्रात्यक्षिकांद्वारे त्यांच्या शंकांचे निरसन केल्याने ग्राहकांनी समाधान व्यक्त केले.

          स्मार्ट (टीओडी) मीटरची कार्यपद्धती, अचूकता व फायदे समजावून गैरसमज दूर करणे आणि वीजबिलासंदर्भातील तक्रारींचे प्राधान्याने निवारण करणे, हा या मेळाव्यांचा मुख्य उद्देश होता. जळगाव परीमंडलाचे मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अधीक्षक अभियंते विनोद पाटील, सायस दराडे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला. 

मेळाव्यांत ग्राहकांना काळानुरूप वीजमीटरच्या तंत्रज्ञानात होत गेलेल्या बदलांची माहिती देण्यात आली. स्मार्ट मीटर हे अत्यंत अचूक असून, ग्राहकांचा प्रत्यक्ष वीजवापर जेवढा आहे, तेवढीच नोंद यामध्ये केली जाते. त्यामुळे बिलिंगच्या तक्रारी कमी झाल्याचे यावेळी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

मेळाव्यांत आलेल्या ग्राहकांच्या शंका दूर करण्यासाठी एकाच सिरीजमध्ये स्मार्ट मीटर व इतर मीटर लावून त्याचे थेट प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. तसेच घरातील ‘वायरिंग लिकेज’मुळे मीटर कशा प्रकारे वेगाने फिरते, हे देखील प्रयोगाद्वारे समजावून सांगण्यात आले. यासोबतच ग्राहकांना महावितरणचे ‘महावितरण ऊर्जा ॲप’ डाऊनलोड करून देऊ दैनदिन वीज वापराची माहिती दाखविण्यात आली.

स्मार्ट मीटर हे स्वयंचलित पद्धतीने रीडिंग घेते, त्यामुळे मानवी हस्तक्षेप टळतो आणि अचूक बिल मिळते. ज्या ग्राहकांना वीजबील वाढीव असल्याची शंका असल्यास त्यांनी  आपल्या घरातील अर्थिंग  तपासून घ्यावी, तसेच विद्युत सुरक्षेसाठी आरसीसीबी (रेसिड्यूअल करंट सर्किट ब्रेकर) बसवून घेण्यासंदर्भात सुद्धा आवाहन करण्यात आले.

या संवाद मेळाव्यांना मिळालेला प्रतिसाद पाहता, आगामी काळात याची व्याप्ती अधिक वाढवली जाणार आहे. लवकरच प्रत्येक शाखा कार्यालय निहाय अशा मेळाव्यांचे आयोजन करण्यात येईल, अशी माहिती महावितरणतर्फे देण्यात आली.

हे संवाद मेळावे यशस्वी करण्यासाठी जळगाव परिमंडलातील सर्व कार्यकारी अभियंते, उपविभागीय अभियंते, अधिकारी, वित्त व लेखा विभागाचे कर्मचारी आणि जनमित्रांनी परिश्रम घेतले. ग्राहकांनी स्मार्ट मीटरबाबत पसरणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता या तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.