(नवापूर) नवापूर तालुक्यात ग्रामीण व शहरी भागात हत्तीरोगाची समस्या असल्याने तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागात आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन औषधोपचार करणार असल्याचे, जिल्हा हिवताप अधिकारी अधिकारी अपर्णा पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. (Community medicine campaign to control elephantisis disease started in Navapur taluka)
हत्तीरोग (Elephantisis) : नवापूर तालुक्यात ग्रामीण व शहरी भागात मोहिम सुरु
नवापूर तालुक्यात ग्रामीण व शहरी भागात ही मोहिम सुरु झाली असून 26 ऑगस्ट 2023 पर्यंत ही मोहिम सुरु राहणार आहे. यामध्ये घरोघरी जावून आरोग्य कर्मचारी गोळ्या खाऊ घालणार आहेत. हत्तीरोगाच्या निर्मुलनासाठी सामुहिक औषधोपचार मोहिम आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात येत आहे. या मोहिमेत नवापुर तालुक्यातील 2 वर्षाखालील मुले, गर्भवती स्त्रिया व गंभीर आजारी रुग्ण वगळता सर्वांना गोळ्या खाऊ घालण्यात येणार आहेत. शहरी व ग्रामीण भागात शाळा, बसस्थानक, रेल्वेस्थानक येथे बुथ आयोजित करण्यात येतील व सर्व कार्यालये, बँका व इतरत्र घरोघरी जाऊन गोळ्या खाऊ घालण्यात येणार आहेत.
हत्तीरोग (Elephantisis) : नवापुर तालुक्यातील प्रत्येक व्यक्तिने आरोग्य विभागाने दिलेल्या गोळ्या खाणे आवश्यक
हत्तीरोग हा बुचेरेरीया बॅनक्रॉफटी या परोपजीवी जंतुमुळे होणारा आजार असुन या आजाराचा प्रसार क्युलेक्स प्रकारच्या डासांमुळे होतो. दुषित व्यक्तिच्या शरीरातील हत्तीरोगाचे जंतु या डासामार्फत निरोगी व्यक्तिच्या शरीरात प्रवेश करतात. नवापुर तालुक्यातील सर्व नागरिकांना एकाच वेळी डी.ई.सी. व अलबेन्डाझॉल गोळ्या खाऊ घातल्यामुळे दुषित आणि वाहक व्यक्तिंच्या शरीरातील हत्तीरोगाचे जंतु मरतात व त्यामुळे निरोगी लोकांना हत्तीरोग होण्याचा धोका टळतो. यासाठी नवापुर तालुक्यातील प्रत्येक पात्र व्यक्तिने आरोग्य विभागाने दिलेल्या गोळ्या खाणे आवश्यक आहे.
हत्तीरोग (Elephantisis) : मोहिमेमध्ये सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे
आरोग्य विभागामार्फत या मोहिमेसाठीचा पुरेसा औषधसाठा, प्रशिक्षण देण्यात आले आहे. शाळांमध्ये जाऊन सदर मोहिमेबाबत जनजागृती करण्यात येत आहे, शहर परिसरात होर्डींग, बॅनर, घंटागाडीद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. नवापुर तालुक्यातील प्रत्येक पात्र लाभार्थ्याने या गोळ्यांचे सेवन करणे आवश्यक असल्याने 17 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट 2023 या कालावधीमध्ये नवापुर तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या हत्तीरोग सामुदायीक औषधोपचार मोहिमेमध्ये सर्व नागरिकांनी सहभाग घेऊन, गोळ्यांचे सेवन करावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र सोनवणे, व जिल्हा हिवताप अधिकारी श्रीमती अपर्णा पाटील यांनी केले आहे.
हत्तीरोग (Elephantisis) : हत्तीरोग म्हणजे काय ? तो कसा होतो ? याला आळा घालणं शक्य आहे का ?
हत्तीरोग डास चावल्याने जंतू संसर्गामुळे होणारा रोग आहे. ‘क्युलेक्स’ प्रजातीच्या डासांपासून हत्तीरोग पसरतो. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार क्लुलेक्स डास हत्तीरोगास कारणीभूत ‘बुचेरिया बॅनक्रॉफ्टीया’ या परजीवी जंतूंचा प्रसार करतात. हत्तीरोग झालेल्या रुग्णाच्या पायला खूप जास्त सूज येते, ज्यामुळे पायाचा आकार बदलतो आणि पाय विद्रुप झालेला दिसून येतो. राज्यात हत्तीरोगाचे सर्वाधिक 23 हजार 823 रुग्ण पूर्व विदर्भातील 6 जिल्ह्यांमध्ये असून चंद्रपूर जिल्हा पहिल्या क्रमांकावर आहे.चंद्रपूर जिल्ह्यात हत्तीपायाचे 10 हजार 380 रुग्ण आढळून आल्याचे जानेवारी 2023 मध्ये निदर्शनास आले आहे.
हत्तीरोग (Elephantisis) : हत्तीरोग कसा पसरतो ?
डास चावल्यामुळे हत्तीरोग होतो.क्लुलेक्स प्रजातीचे डास हत्तीरोगासाठी कारणीभूत ‘बुचेरिया बॅनक्रॉफ्टीया’ या परजीवी जंतूंचे वाहक असतात. हा परजीवी वाहक डास मानुष्याला चावल्यानंतर हत्तीरोगाचे जंतू माणसाच्या शरीरात सोडतो. माणसाच्या शरीरात हे जंतू चावलेल्या ठिकाणाहून किंवा अन्य ठिकाणाहून त्वचेतून शरीरात प्रवेश करतात. हत्तीरोगाच्या जंतूंनी शरीरात प्रवेश केल्यानंतर लक्षणं दिसून येण्यासाठी साधारणत: 8 ते 16 महिन्यांचा कालावधी लागतो.
हत्तीरोग (Elephantisis) : हत्तीरोगाची लक्षणं काय ?
हत्तीरोगाच्या लक्षणाच्या चार अवस्था असतात.जंतू शरीरात शिरकाव केल्यानंतर आजाराची लक्षणं दिसून येऊ शकतात.लक्षणविरहीत किंवा वाहक अवस्थेमध्ये रुग्णाच्या रात्री घेतलेल्या रक्ताच्या नमुन्यात मायक्रो फायलेरिया आढळून येतात. मात्र रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणं आढळून येत नाहीत.तीव्र लक्षण अवस्थेत- ताप येतो, लसीकाग्रंथींचा दाह सुरू होतो. लसीकाग्रंथींना सूज येते किंवा पुरुषांमध्ये वृषणदाह सुरू होतो. दीर्घकालीन संसर्गावस्थेत, हात, पाय आणि बाह्य जननेंद्रीयांमध्ये सूज येते.
हत्तीरोग (Elephantisis) : हत्तीरोगाची लागण कोणाला होऊ शकते ?
आरोग्यविभागाच्या मते सर्व वयोगटातील व्यक्तींना हत्तीरोगाची लागण होऊ शकते.स्त्री आणि पुरुष दोघांनाही हत्तीरोग होऊ शकतो. हत्तीरोगाचा प्रादुर्भाव असलेल्या परिसरात पुरुषांमध्ये हत्तीरोगाचं प्रमाण जास्त असल्याचं दिसून येतं. काम आणि इतर कारणांमुळे वारंवार स्थलांतर करणाऱ्या लोकांमुळे एका भागातून दुसऱ्या भागात हत्तीरोगाचा प्रसार होतो. हत्तीरोगाच्या रोगप्रतिकारशक्तीबाबत अद्याप निश्चित माहिती उपलब्ध नाही. वाढतं शहरीकरण, स्थलांतर, औद्योगिकीकरण, अस्वच्छता, गरीबी आणि इतर कारणं याच्या प्रसारासाठी कारणीभूत आहेत.
हत्तीरोग (Elephantisis) : प्रतिबंधात्मक उपाययोजना काय आहेत ?
डास अळी अवस्थेत असताना डासांची उत्पत्ती स्थानं कमी करणे. मैला, घाण यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे. साचलेल्या पाण्यातून वनस्पती, गवत काढून टाकणे. कीटकनाशकांची फवारणी करणे. लोकांमध्ये हत्तीरोगाबाबत जनजागृती करणे. या बरोबरच हत्तीरोग झालेल्या रुग्णांनी काळजी घेणंसुद्धा गरजेचं आहे.