(तळोदा) स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव “मेरी मिट्टी मेरा देश” अंतर्गत ग्रामपंचायत सावरपाडा अंतर्गत रावलापाणी येथे मशाल फेरी, कलश मिरवणूक, वृक्षारोपण, पंचप्राण शपथ व शीलाकलश चे अनावरण कार्यक्रम घेण्यात आला. दिपप्रज्वलनाने मिट्टी को नमन विरों का वंदन अभियान राबविण्यात आले.
त्यावेळी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी आर. एम. पाटील, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी पी.पी. कोकणी, विस्तार अधिकारी बी. डी. मोहिते, सहाय्यक गट विकास अधिकारी पवार, अभियंता पराडके, गटशिक्षण अधिकारी धनगर, पंचायत समिती सदस्य अनिल पवार, गावाचे सरपंच अनिता महेंद्र पवार, ग्रामसेवक पूनम पाटील, रतिलाल पावरा, महेंद्र पवार व महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
![Meri Mitti Mera Desh- Rawalpani](https://nandurbarnews.in/wp-content/uploads/2023/08/Meri-Mitti-Mera-Desh-Rawalpani-1024x576.jpg)
“मेरी मिट्टी मेरा देश” : देश आणि वीरांच्या बलिदानाप्रती कृतज्ञता
देश आणि वीरांच्या बलिदानाप्रती कृतज्ञता देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असतानाच आगामी काळात देशाची वाटचाल कशी असावी, यावर मंथन व्हावे, भविष्याचा वेध घेताना या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या वीरांचेही स्मरण व्हावे आणि 2047 पर्यंत आपला देश विकसित देश म्हणून नावारुपाला यावा, यासाठी सर्वांच्या योगदानाची गरज आहे. राज्यात ग्रामपंचायत, तालुकास्तर, जिल्हास्तर असे विविध उपक्रम त्यानिमित्त आयोजित केले जात आहेत. देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद वीरांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि नमन करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. |
जनसहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी https://merimaatimeradesh.gov.in हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले असून, माती किंवा मातीचा दिवा हाती धरून काढलेला सेल्फी नागरिक या संकेतस्थळावर अपलोड करू शकणार आहेत. या उपक्रमात सर्वांचा सक्रीय सहभाग आणि आपल्या देशाच्या वीरांप्रतीची कृतज्ञता प्रत्येकाने व्यक्त करावयाची आहे.
![Meri Mitti Mera Desh- Rawalpani](https://nandurbarnews.in/wp-content/uploads/2023/08/Rawalpani-Meri-Mitti-Mera-Desh-1024x576.jpg)
“मेरी मिट्टी मेरा देश” : पंचप्रण प्रतिज्ञा
स्वातंत्र्यानंतरच्या अमृतमहोत्सवी काळात देशाने अनेक बाबतीत उत्तुंग झेप घेतली आहे. आता विकसित देश बनण्याच्या दृष्टीने प्रत्येकाचे या देशासाठी योगदान, गुलामगिरीची मानसिकता दूर करणे, समृद्ध वारशाचा अभिमान, एकता आणि बंधुता टिकवणे, नागरिकाची कर्तव्ये पार पाडणे आणि देशाचे रक्षण करणाऱ्यां प्रति आदर व्यक्त करणे यावर आधारित पंचप्रण प्रतिज्ञा या उपक्रमात घेण्यात येणार आहे.
केवळ एखादा कार्यक्रमापुरते मर्यादित न राहता गाव ते शहरांपर्यंत आपल्या माती विषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण व्हावी याबाबत अभियान स्वरुपात कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. या अभियानात ग्रामीण स्तरावर ग्रामपंचायती, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी तसेच, नागरी भागात नगरपंचायती, नगरपरिषदा, महानगरपालिका यांनी त्यांच्या स्तरावर अधिकाधिक लोकसहभागातून उपक्रम राबविण्याचे नियोजन केले आहे.