
(नंदुरबार) सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा सिकलसेल नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालय आवार, नंदुरबार येथे आज सिकलसेल मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश सिकलसेल रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत आरोग्य सेवा, मार्गदर्शन व शासकीय योजनांचा लाभ पोहोचवणे हा आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या शुभहस्ते झाले, तर अध्यक्षस्थान मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नमन गोयल यांनी भूषविले. या प्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र सोनवणे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनय सोनवणे, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरिश्चंद्र कोकणी तसेच श्री. गोविंद चौधरी, सहसंचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमात मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी रुग्णांशी संवाद साधून सिकलसेल आजाराची लक्षणे, नियमित तपासणीचे महत्त्व, तसेच औषधोपचारातील सातत्य याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी सिकलसेलग्रस्त रुग्णांना प्रोत्साहनपर शब्द देत अपंगत्व प्रमाणपत्रांचे वितरण केले आणि शासकीय योजना, सुविधा तसेच आर्थिक सहाय्याबाबत मार्गदर्शन केले.
मा. जिल्हाधिकारी महोदयांनी सांगितले की, ‘सिकलसेल आजाराबाबत जनजागृती, नियमित तपासणी आणि उपचार हे सिकलसेल मुक्त जिल्ह्याकडे जाण्याचे पहिले पाऊल आहे.’ त्यांनी रुग्णांच्या सोयीसाठी जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र सिकलसेल IPD वॉर्ड सुरू करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली. तसेच प्रत्येक महिन्याच्या अखेरीस नियमित सिकलसेल मेळावे आयोजित करण्याची घोषणा त्यांनी केली.
अध्यक्षीय भाषणात मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नमन गोयल यांनी सांगितले की, ‘सिकलसेल रुग्णांची काळजी ही जिल्हा प्रशासनाची प्राथमिकता आहे. प्रत्येक रुग्णाने सातत्याने औषधे घ्यावीत, तपासणी करावी आणि आरोग्य विभागाशी सतत संपर्कात राहावे.’
या मेळाव्यात आरोग्य विभागातील अधिकारी, वैद्यकीय कर्मचारी आणि सामाजिक संस्थांनी सक्रीय सहभाग नोंदवला.
*सिकलसेल टोल-फ्री हेल्पलाईन:*
02564-299291
02564-299274
जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग आणि नागरिकांच्या सहकार्याने ‘सिकलसेल मुक्त नंदुरबार’च्या दिशेने हा मेळावा ठरला एक प्रेरणादायी पाऊल.
#SickleCellAwareness#Nandurbar#SickleCellFreeDistrict#HealthForAll#DrMittaliSethi#NamanGoyal#NandurbarDistrict#PublicHealth#NHM#SickleCellControl















